चार वर्षे सेनेची, एक वर्ष भाजपाचे

0
9

मुंबई :दि. ८- कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौरपद चार वर्षे शिवसेनेला तर एक वर्ष भाजपाला देण्याचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भाजपाच्या मुंबई कार्यालयात ही घोषणा केली.

उपमहापौरपद हे चार वर्षे भाजपाला तर एक वर्ष शिवसेनेला देण्यात येणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्षपद आधी दोन वर्षे भाजपाला व नंतरची दोन वर्षे शिवसेनेला दिले जाईल. शेवटच्या वर्षात ते कोणाकडे ठेवायचे, हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रितपणे ठरवतील. दानवे आणि देसाई यांनी शुक्रवारी सायंकाळी कल्याण-डोंबिवलतील सत्तेसाठी बोलणी केली होती. त्यानंतर वित्तमंत्री आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेचे नेते व सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी बसून फॉर्म्युला निश्चित करावा, असे ठरविण्यात आले. त्यानुसार मुनगंटीवार आणि शिंदे यांच्यात आज चर्चा होऊन फॉर्म्युला ठरला. मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांशीही दोन्ही मंत्र्यांनी चर्चा केली आणि सायंकाळी फॉर्म्युला जाहीर झाला.