जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक गाव टंचाईमुक्त करु- मुख्यमंत्री

0
8

नागपूर दि. ८: माझ्या गावात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब माझ्या मालकीचा आहे. पावसाचा प्रत्येक थेंब अडवून माझ्या गावचे शिवार जलयुक्त करण्याचा संकल्प प्रत्येकाने करण्याचे आवाहन करतानाच उद्योग समूह, स्वयंसेवी संस्थानी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जलयुक्त शिवार अभियानासाठी पुढाकार घेऊन राज्यातील प्रत्येक गाव टंचाईमुक्त करण्यासाठी सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हिंगणा तालुक्यातील मौजा अंबाझरी येथील 36 किलोमीटर नाला खोलीकरण व रुंदीकरण्याच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर, खासदार कृपाल तुमाने, आमदार समीर मेघे, विभागीय आयुक्त अनूप कुमार, परसिस्टंट फाऊंडेशनचे दत्तात्रय पांडे, शेखर पाटणकर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे मनीष बदियानी, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जोंधळे, प्रधान वन संरक्षक श्री. रेड्डी, रोटरी क्लबचे महेश मोकलकर, माजी आमदार विजय घोडमारे आदी उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते अनुदानाचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी मौजा अंबाझरी नाला खोलीकरण कामाचे भूमिपूजन, वनविभागातर्फे वनक्षेत्रात वृक्षारोपण करुन या मोहिमेचा शुभारंभ केला. सूत्रसंचालन संदीप शिरखेडकर यांनी केले.