अधिवेशनाचे कामकाज उद्या पर्यंत तहकूब

0
12

नागपूर,दि.9- हिवाळी अधिवेशनाच्या आज तिस-या दिवशी ही विरोधकांच्या गदारोळामुळे विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज होऊ न शकल्याने  तहकूब करण्यात आले.कामकाज सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु सरकार जोपर्यंत संपुर्ण कर्जमाफीची घोषणा करीत नाही,तोपर्यंत चर्चेत सहभागी होणार नसल्याची ताटर भूमिका विरोधी पक्षाने घेतल्याने आज कामकाजच होऊ शकले नाही. त्यामुळे अधिवेशनाच्या कामाला आता उद्या गुरुवारीच सुरवात होणार आहे.तोपर्यंत सरकारच्यावतीने काय तोडगा काढण्यात येते यावरच उद्या्च्या कामकाजाचे भवितव्य आहे.

शेतक-यांना संपूर्ण कर्ज माफीची घोषणा सरकारने केल्याशिवाय आपण चर्चेत सहभाग घेणार नाही.  असा पवित्रा विरोधकांनी घेतल्यामुळे आजचा दिवसही कामकाजा विना गेला. कामकाज सुरु होण्याआधी सकाळी विधानभवना बाहेर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आदी विरोधी पक्षांनी शेतक-यांच्या प्रश्नावर जोरदार नारेबाजी करून परिसर दणाणून सोडला.

धान, कापूस, ऊस, कांदा, केळी, संत्रा उत्पादक शेतक-यांना भरीव मदतीची गरज आहे. यासाठी ३१००० कोटींच्या पुरवणी मागण्यात याची तरतूद करण्यात यावी. राज्यातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. शेतक-यांना वाचवायचे असेल तर त्यांच्या हितासाठी मदतीची घोषणा सरकारने करणे गरजेचे आहे. ३०२ चा गुन्हा कुणावर कुणावर दाखल करावा हे राज्य प्रमुखांनी किंवा मंत्र्यांनी सांगावे. शेतक-यांच्या प्रश्नावर चर्चा खूप झाली आता घोषणा हवी. तरच विधीमंडळाचे कामकाज चालू देऊ असा पवित्रा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी घेतला.