दुष्काळाच्या पॅकेजसाठी खासदार पटोले यांनी घेतली वित्तमंत्री जेटली यांची भेट

0
8

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून केंद्रशासनाने राज्याला विशेष पॅकेज जाहीर करावे या मागणीसाठी आज खासदार नाना पटोले यांनी केंद्रीय वित्तमंत्री अरूण जेटली यांची भेट घेतली.

महाराष्ट्र शासनाने राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सर्वकष अहवाल यापूर्वीच केंद्र शासनास सादर केला आहे. केंद्र शासनाच्या पथकाने महाराष्ट्रात जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली आहे. मराठवाडा विदर्भ या भागातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. महाराष्ट्रातील एकूणच दुष्काळी परिस्थितीची चर्चा खासदार पटोले यांनी वित्तमंत्री जेटली यांच्यासोबत केली.

राज्य शसनाने 1 नोव्हेंबर 2015 रोजी 4 हजार 200 कोटी रूपयांचे पॅकेज महाराष्ट्राला द्यावे, असा प्रस्ताव केंद्र शासनास सादर केला आहे. हे पॅकेज राज्य शासनास तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी खासदार पटोले यांनी आज जेटली यांच्याकडे केली. महाराष्ट्राला भरीव मदत मिळेल व लवकरच हे पॅकेज जाहीर करू, असे आश्वासन वित्तमंत्री जेटली यांनी खासदार पटोले यांना दिले आहे.