‘अणें’वर शिवसेनेचा ‘सूर’ कायम

0
7

नागपूर दि. २२-राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या वक्तव्याला विरोध करण्यातच शिवसेनेने हिवाळी अधिवेशन गाजवलं. आता अधिवेशनाच्या कामकाजाचे दोन दिवस राहिले असताना शिवसेनेचा अणें ‘सूर’ मात्र अद्याप कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज विधानभवन परिसरात शिवसेना आमदारांनी पुन्हा ” श्रीहरी अणे मुर्दाबाद” अशा घोषणा दिल्या. तसेच १०६ हुतात्म्यांच बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, अखंड महाराष्ट्र राहिलाच पाहिजे अशा घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला. यावेळी शिवसेना आमदारांनी हुतात्म्यांची प्रतिकृती परिसरात ठेऊन त्या प्रतिकृतीला हार- फुलांनी वंदन करत आंदोलन केले.

श्रीहरी अणे यांच्या स्वतंत्र विदर्भावरील वक्तव्यावर निवेदन देताना अणे याचं वैयक्तिक वक्तव्य असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, अणे वारंवार अशी वक्तव्ये करत आहेत. त्यांनी औरंगाबाद येथे देखील अशा प्रकारचे वक्तव्य केले. राज्याच्या महाधिवक्ता पदावर असताना अशा प्रकारचे महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे वक्तव्य करणा-या व्यक्ती बद्दल अनादर निर्माण होणे साहजिक आहे. त्यांनी याप्रकरणी माफी मागायला हवी. असे मत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.