नागपूरसह गोंदिया, अकोल्यात पारा 6 च्या घरात

0
11
पुणे- उत्तरेकडून वाहणा-या थंड वा-यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यभरातील पारा कमालीचा घसरला आहे. शनिवारी पुणे व परिसरातील किमान तापमान 6.6 अंश सेल्सियस एवढे खाली आले आहे. पुण्यात गेल्या 5 वर्षातील हे नीचांकी तापमान ठरले आहे तर डिसेंबर महिन्यातील हे दहा वर्षातील नीचांकी तापमान ठरले आहे.मागील दोन- तीन दिवसांपासून नागपूरसह विदर्भातही थंडीची लाट पसरली आहे. उपराजधानी नागपूरसह गोंदिया, अकोल्यात पारा 6 च्या घरात घसरला आहे.27 डिसेंबरला तपमान 5 अंशावर जाण्याची शक्यता असून, 29 डिसेंबरपर्यंत 7 ते 8 अंश सेल्सिअस दरम्यानच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दरम्यान,नाशिकमध्येही पाऱ्याने यंदाचा नीच्चांक गाठला असून निफाड तालुक्यात पारा 5 अंश सेल्सियसवरुन 5.2 वर आला आहे तर नाशिक शहरात तो 5.4 अंश सेल्सियस इतका खाली घसरला आहे.
दरम्यान, पुढील तीन दिवसही थंडी कायम राहणार असून शनिवार-रविवारी त्यात अधिक घट होण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. यंदा दुष्काळासोबतच गारपीट आणि बेमोसमी पावसाने राज्याला चांगलाच तडाखा दिला. त्यात लांबलेली थंडीची जणू लाटच आता राज्यात पसरली आहे. उत्तर कोकणासह उत्तरेकडील थंड वा-यामुळे राज्यात कधी नव्हे इतकी थंड वाढली असून मुंबईतही गेल्या पन्नास वर्षातील निच्चांकी तपमानाची नोंद गेल्या तीन दिवसांत झाली आहे.