एमपीएससी परीक्षेसाठी वयोमर्यादा ४० करा

0
12

मुंबई दि.९: एमपीएससीची परीक्षा देणा-या परीक्षार्थीची वयोमर्यादा २८ वरून ४० करण्यात यावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १० जानेवारीपासून राज्यभर सह्यांची मोहीम राबवण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. सरकारने वेळीच सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेत वाढ करावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली होती. हाच प्रश्न त्यांनी औचित्याच्या मुद्दय़ाच्या माध्यमातून सभागृहात उपस्थित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात याबाबत आपण आढावा घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र आता जानेवारीचा पहिला आठवडा उलटून गेला तरी याबाबत कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. म्हणूनच या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर सह्यांची मोहीम राबवणार असल्याची माहिती नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र शासनातर्फे एमपीएससी स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. त्यामध्ये खुल्या प्रवर्गातून पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा देण्यासाठी सध्या वयोमर्यादा २८ आहे. तर इतर परीक्षेसाठी ही मर्यादा ३३ पर्यंत आहे. राखीव प्रवर्गासाठी पात्रता वयोमर्यादा ३८ आहे. या परीक्षेसाठी राज्यातील खुल्या वर्गातील लाखो विद्यार्थी प्रयत्न करतात. मात्र वयाच्या मर्यादेमुळे त्यांच्यावर अन्याय होतो, असे सांगून नितेश राणे म्हणाले की, ही मर्यादा एकदम अपुरी आहे. ती वाढवली पाहिजे. मी इतरही काही राज्यातील वयोमर्यादेची माहिती घेतली तेव्हा अनेक राज्यात ती ४० वर्षापर्यंत असल्याचे आढळून आले आहे.

काही राज्यात तर ती वाढवून ४५ पर्यंत करण्यात आली आहे. याबाबत नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन दिले होते. औचित्याच्या मुद्दय़ाच्या माध्यमातून हा प्रश्न विधानसभेतही उपस्थित केला होता. तेव्हा डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात याबाबत आपण निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र
अद्याप शासकीय पातळीवर तसे काही प्रयत्न होताना दिसत नाहीत.