माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर कालवश

0
2
नाशिक, दि. १९ – महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. दौलतराव आहेर यांचे मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्यावर देवळा येथे आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येतील.
डॉ. आहेर हे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. १९८९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली व ते विजयी होऊन लोकसभेवर निवडून गेले. तसेच शिवसेना-भाजपा युती सरकारच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्रीपद भूषवले.
देवळा तालुक्याची निर्मिती, राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी राजीव गांधी आरोग्य योजनेची स्थापना, आरोग्य विज्ञान विद्यापीठ निर्मिती, नाशिकमध्ये भव्य व सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा रुग्णालयाची मुहुर्तमेढ करणे, अशी अनेक कामे त्यांनी केली.