देवरी धावलीः राज्यस्तरीय हॉफ मॅराथान स्पर्धा

0
8

देवरी, (ता.25)- भारतीय लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने आज मतदार दिनाचे औचित्य साधून देवरी येथे आज (ता. 25) राज्यस्तरीय हॉफ मॅराथान स्पर्धेचे आय़ोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेचे आयोजन देवरी येथील उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, पोलिस विभाग आणि देवरी मॅराथान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. स्थानिक जिल्हा परिषद विद्यालय क्रीडा संकूलाच्या पटांगणावर या स्पर्धेची सुरवात सकाळी आठ वाजता उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी हिरवी झेंडी दाखवून केली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक संदीप पखाले, तहसीलदार संजय नागटिळक, देवरीच्या नगराध्यक्ष सुमन बिसेन, ठाणेदार राजेंद्र तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.

ही स्पर्धा तीन विभागात घेण्यात आली.  18 वर्षावरील 21 नागरिकांसाठी किलोमीटर अंतराची स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये राज्यातील सर्वच विभागातील सुमारे 2 हजारावर  स्पर्धक सहभागी झाले होते. दुसऱ्या गटात 18 वर्षाखालील स्पर्धकांचा समावेश होता. ही स्पर्धा 8 किलोमीटर अंतरासाठी घेण्यात आली असून यामध्ये 1 हजार स्पर्धक सहभागी झाले होते. तिसऱ्या गटात 45 वर्षावरील 100वर स्पर्धक सहभागी झाले होते.

विजेत्यांना गडचिरोलीचे खासदार अशोक नेते आणि आमगाव विधान सभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांचे हस्ते पुरस्कार देण्यात आले. विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे- पहिल्या गटात मध्य रेल्वेच्या नागराज खुरसणे व राजश्री पद्गीरवार हिला 12 हजार रोख प्रथम पुरस्कार, चंद्रपूरचा पवन देशमुख व नागपूरची रश्मी गुरनुले, हिला 9 हजार रोख, शुभम मेश्राम व स्नेहा बोरकर हिला 6 हजार रोख व मानचिन्ह देण्यात आले. दुसऱ्या गटात सालेकसा येथील संदीप खुळसुंगे व नागपूरची स्वेता कदम हिला 5 हजार रोख, नागपूरचा संधेश शेबे व नागपूर येथील ऋतुजा शेंडे हिला 3 हजार रोख आणि गोंदियाचा राजेंद्र घासले व उषा टेकाम हिला 2 हजार रोख आणि पदक प्रदान करण्यात आले. ज्येष्ट नागरिकांच्या गटात नागोराव भोयर 2 हजार 100, घनशाम पद्मगीरवार याला दीड हजार आणि प्रल्हाद पाटणकर याला 1100 रोख आणि पदक प्रदान करण्यात आले. प्रत्येत गटात गोंदिया जिल्हा विशेष पुरस्कार ठेवण्यात आले होते.