मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आता नागपुरात सुरु

0
13
नागपूर : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या गरीब आणि दुर्धर आजारावर उपचार करण्यास असमर्थ व्यक्तींसाठी आता मुंबईनंतर राज्यात नागपूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या समितीची पहिली बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली.मुख्यमंत्री सचिवालयात यासंदर्भात मदत मिळण्यासाठी राज्यभरातून अनेक अर्ज प्राप्त होतात. तथापि या आजाराव्यतिरिक्तही जीवितास धोका असलेले आजार तसेच अपघातातील रुग्ण असतात. मुंबई सचिवालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या धर्तीवर विदर्भातील रुग्णांना मुंबईला न जाता येथेच तत्काळ मदत मिळावी, यासाठी हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

यासाठी नागपुरात वैद्यकीय सहायता कक्षामध्ये प्राप्त होणाऱ्या अर्जांची छाननी करण्यासाठी नागपूर विभाग कार्यकारिणी समिती गठीत करण्यात आली असून, या समितीमध्ये विभागीय आयुक्त, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नोडल अधिष्ठाता, उपसंचालक आरोग्य सेवा, नागपूर विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक हे सदस्य तर डॉ.के.आर.सोनपुरे हे मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सदस्य सचिव यांचा समावेश आहे.

या समितीची पहिली बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली. त्या बैठकीमध्ये दोन अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये बाबुराव ढोके, कामठी यांना वैद्यकीय सहायता पुरविण्यात आली आहे. तर दुसरा अर्ज डिंपल दिपक मोते या मूकबधीर मुलीचा प्राप्त झाला. मात्र तो प्रलंबित ठेवण्यात आला आहे. डिंपल मोते हिला डिसेंबर 2015 मध्ये या समितीच्यामार्फत वैद्यकीय सहायता देण्यात आली. असे असले तरीही विशेष बाब म्हणून हा अर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत एका व्यक्तीला तीन वर्षात फक्त एकदाच ही मदत देता येते, अशी माहिती डॉ.के.आर. सोनपुरे यांनी दिली.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या समितीची बैठक दर मंगळवारी व त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरच्या कामकाजाच्या दिवशी होणार आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून ह्दयरोग शस्त्रक्रिया व कर्करोगग्रस्तांना राजीव गांधी जीवनदायी योजनेमधील लाभार्थी वगळून इतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णाला (1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न) 2 लाख रुपयांपर्यंत ही मदत देण्यात येते. तसेच ट्रॉमा रुग्णांना संबंधित डॉक्टरांनी प्रमाणित केल्याप्रमाणे रस्त्यावरील भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला (डोक्याची गंभीर जखम) 1 लाख रुपयाची मदत दिली जाते. सेरेब्रो व्हॅस्कुलर ॲक्सिडंटमध्ये 50 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना (1 लाखा पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न) 2 लाख रुपयांपर्यंत मदत या वैद्यकीय सहायता कक्षामार्फत केली जाते.

या रकमेपेक्षा जास्त रकमेची मदत करायची असल्यास त्या संबंधीचे संपूर्ण अधिकार हे मुख्यमंत्री यांचे स्वेच्छाधिकार असतील. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून मदत हवी असल्यास पात्र रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष, नागपूर विभाग, मुख्यमंत्री सचिवालय, हैद्राबाद हाऊस, सिव्हिल लाईन, नागपूर (0712-2565392) वर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सचिवालयाच्या निधी व लेखा सहायक संचालक वैशाली पाटील यांनी केले आहे.