जिल्हाधिकाऱ्यांना सर्व विभागाचे प्रमुख म्हणून अधिकार देण्यात येतील- मुख्यमंत्री

0
8

पुणे : आज जिल्हाधिकाऱ्यांच्या कामांचे स्वरूप बदलले आहे. ते आता कलेक्टर न राहता लोकसेवक झाले आहेत. त्यांना जी कामे दिली जातात ते ती पूर्ण करतात. तेव्हा त्यांना अधिकार दिले तर ते आणखी चांगले काम करतील, म्हणून जिल्हा पातळीवर सर्व विभागांचे प्रमुख म्हणून त्यांना अधिकार देण्यात येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

येथील यशदामध्ये गुरूवारपासून सुरु असलेल्या महसूल परिषदेच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, विविध विभागाचे विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी डिजीटल महाराष्ट्रांतर्गत एक भाग म्हणून कोकण विभागाने तयार केलेल्या ई-गव्हर्नन्सच्या संकेतस्थळाचे उद्घाटन, सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, मालेगावचे अॅड. शिरीष हिरे यांनी लिहिलेल्या लँड इश्यूज इन इंडिया पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर श्री. श्रीवास्तव यांनी प्रास्ताविकात दोन दिवसातील परिषदेत झालेल्या विविध निर्णयाची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.

महसूल विभाग हा राज्याचा कणा आहे. आता जिल्हाधिकारी महसूल गोळा करीत नसतो तर तो जिल्ह्याचा विकास अधिकारी झाला आहे. आपल्या विभागाकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत.जलयुक्त शिवार योजनेचे काम आपण उत्तम केले आहे. उर्वरित कामे मार्चअखेर पूर्ण करावीत, नवीन ५००० गावांची निवड करावी, २००० कोटी रुपयांचा मदतीचे वाटप करावे, राज्य शासनाच्या उपक्रमांना जमीन उपलब्ध करून देण्याचे काम उत्तम करण्याबरोबरच कृषी उत्पादन वाढवण्याचे काम आपणाकडून व्हावे, असे आवाहन मुख्य सचिव श्री. क्षत्रिय यांनी केले.

महसूल मंत्री श्री. खडसे म्हणाले, अनेक कायद्यात गेल्या वर्षभरात आपण बदल केले, शासन निर्णय घेतले, काही बाबतीत निर्णय घेण्याची गरज आहे. महसूलचा कार्यभार पारदर्शक करण्याबरोबरच लोकांना चांगल्या सेवा देता याव्यात, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. चांगली कामे झाली आहेत. त्यांची प्रसिद्धी झाली पाहिजे. आपण घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत.

मुख्यमंत्री म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांचे काम खूप चांगले चालले आहे. त्यांना दिलेला अजेंडा त्यांनी राबविला आहे. प्रत्येक जिल्हाधिकारी इनोव्हेटर आहेत. ते एक तरी नवीन चांगले काम करीत आहेत. त्यांचे काम इतर जिल्ह्यात व्हावे म्हणून प्रयत्न झाले पाहिजेत. पूर्वी आपण कलेक्टर होतो, इंग्रजांच्या काळात आपण घेणारे होतो. आता आपण लोकशाहीत देणारे झालो आहोत. शासकाच्या भूमिकेतून सेवकांच्या भूमिकेत परिवर्तीत केले तर पारदर्शकता आणि गतिमानता कामात येते. या दोन्ही एकत्रित येत नाहीत तोपर्यंत शासन लोकाभिमुख होणार नाही. लोकशाहीत या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना जे काम दिले जाते ते पार पाडतात. पण खालची यंत्रणा तितकी गतिमान होत नाही. जिल्हाधिकाऱ्यांना सर्व विभागाच्या प्रमुखांचा दर्जा दिला पाहिजे. याबाबत आपण कार्यवाही केली पाहिजे. याचे यश जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीत दिसून आले.