16 ते 22 मार्च या कालावधीत जागतिक जलदिनानिमित्त जल जागृती सप्ताह

0
21

मुंबई ,दि.2: राज्यात दरवर्षी २२ मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने राज्य शासनाने 16 ते 22 मार्च या कालावधीत ‘जल जागृती’ सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. प्रत्येक महसूल विभागात जलजागृती सप्ताहात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यीतल तीन जिल्ह्याचा महाराष्ट्रदिनी यथोचित गौरव केला जाणार

राज्यातील सिंचन व बिगर सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे राज्य शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग व सहकार्य घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पाण्याची उपलब्धता व पाणी वापराचे नियोजन, पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याचा गरजेपुरता वापर करणे, नैसर्गिक जलस्त्रोत, नद्या व जलाशयाचे प्रदूषण रोखणे, पायाभूत सुविधांचे संरक्षण करणे, पाण्यासंबंधी कायदे व नियमाचे पालन करणे याबाबत समाजामध्ये जागृती व साक्षरता निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे श्री. महाजन यांनी सांगितले.

जल जागृती सप्ताहानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचा शुभारंभ 16 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्याचवेळी सर्व जिल्ह्यात सप्ताहाचा शुभारंभही होईल. कार्यक्रमाला जिल्हा स्तरावरील लोकप्रतिनिधी, महानगरपालिकेचे पदाधिकारी, नगरपालिका, ग्रामपंचायती व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहभाग घ्यावा, असेही श्री. महाजन यांनी सांगितले. या सप्ताहाचा समारोप 22 मार्चला प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या उपस्थितीत होणार आहे.

जलजागृती सप्ताहांतर्गत विभाग, जिल्हा, तालुका व गाव पातळीवर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयामार्फत जलजागृतीसंदर्भात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या जलजागृती सप्ताहामध्ये जलसंपदा, कृषी, ग्रामविकास व जलसंधारण, पाणीपुरवठा, नगरविकास, पर्यावरण, उद्योग, शालेय शिक्षण व क्रिडा, उच्च व तंत्रशिक्षण, माहिती व जनसंपर्क विभाग सहभागी होणार असल्याची माहितीही श्री. महाजन यांनी दिली.