भुजबळांच्या मालमत्तांवर ईडीचे धाडसत्र सुरुच

0
9
वृत्तसंस्था
मुंबई- माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील घर, ऑफिसवर आज पुन्हा एकदा ईडीने छापे टाकले. तीन दिवसापूर्वीच म्हणजे सोमवारीही ईडीने भुजबळांच्या विविध 9 मालमत्तांवर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर भुजबळ यांचे पुतणे व माजी खासदार समीर भुजबळ यांना ईडीने अटक केली होती. गेल्या वर्षी जून महिन्यात एसीबी आणि ईडीने सर्वप्रथम धाडी घातल्या होत्या. आतापर्यंत तीन वेळा भुजबळांच्या मालमत्तांवर छापे टाकण्यात आले आहेत.
दरम्यान, छगन भुजबळ यांच्याविरोधात ईडी असो की एसीबी यांना अद्याप एकाही आरोपाचे पुरावे मिळत नसल्याने ईडी वारंवार धाडी टाकत असल्याचे कळते. कारण कोर्टाने या प्रकरणात भुजबळांवर महिन्याभरात आरोपपत्र दाखल करण्यास सांगितले आहे. मात्र, तपास व चौकशी यंत्रणांकडे कोणतेही पुरावे नसतील तर आरोपपत्र कसे दाखल करायचे हा प्रश्न आहे. त्यामुळेच विविध ठिकाणी व अनेक वेळा धाडसत्र राबवून काही पुरावे हाती लागतात का यासाठी ईडी प्रयत्नशील असल्याचे कळते.