संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान बंद ; भाजप सरकार”अलर्जी‘

0
10

पाणीपुरवठा विभागाचे आदेश

खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.10 -आपल्या ह्यातीतच  स्वच्छतेचा मूलमंत्र देत आयुष्यभर हातात झाडू घेणाऱ्या संत गाडगेबाबा यांच्या नावाचाही राज्यातील  भाजप सरकारला “अलर्जी‘ झाली असून त्यांच्या नावाने तत्कालीन ग्रामविकास मंत्री स्व.आर.आर.पाटील यांनी सुरु केलेले संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानच बंद पाडण्याचे आदेश दिले आहेत.वास्तविक महाराष्ट्रात गेल्या 15 वर्षापासून हे अभियान राबविले जात आहे,या अभियानामुळेच गावागावात स्वच्छतेबद्दल जागृती आली हे विसरता येत नाही.सोबतच या अभियानाची यश्वस्वीता बघूनच तत्कालीन केद्र सरकारने निर्मल ग्राम अभियानाची सुरवात केली होती.परंतु विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस सरकारच्या काही चांगल्या योजनांनाही बंद करण्याचा सपाटा सुरु केला आहे.त्यामुळेच की काय राज्यातील भाजप सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेखाली सुरू असलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा ठसा कायम राहावा यासाठी जागतिक स्तरावर दखल घेतलेले संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान बंद करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाने काढले आहेत.  पाणीपुरवठा विभागाने 6 फेब्रुवारीला राज्यातल्या सर्व जिल्हा परिषद मुख्याधिकारी आणि सर्व विभागीय आयुक्‍तालयांना आदेश पाठवून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची अंमलबजाणी स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. पाणीपुरवठा विभागाने पाठवलेल्या या पत्रात सन 2014-2015 वर्षात या अभियानाच्या तपासणीचे काम विभागीय स्तरावर प्रलंबित असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे 2015-2016 या वर्षात पुन्हा या अभियानाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू करणे शक्‍य नसल्याचे स्पष्ट केले आहे. वारंवार सांगूनही विभागीय स्तरावर फारसी प्रगती नसल्याने चालू वर्षातली प्रकिया पूर्ण करण्यास विलंब लागण्याची शक्‍यता असल्याचे कारण देत या अभियानांतर्गत सुरू असलेली सर्व प्रक्रिया स्थगित करण्याचे स्पष्ट आदेश पत्रात दिले आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारचे जे वाईट ते जगासमोर धुमधडाक्‍यात मांडणाऱ्या भाजप सरकारला मात्र आघाडी सरकारचे “जे चांगले‘ ते समाजाच्या समोर ठेवायचेच नाही, असा निर्धार केल्याचा आरोप होत आहे.