‘सेतू भारतम्’ अंतर्गत महाराष्ट्रातील १२ मार्गावर पूल बांधण्यात येणार

0
17

नवी दिल्ली : सुरक्षित रस्त्यांच्यादृष्टीने आखण्यात आलेल्या ‘सेतू भारतम्’ या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी उदघाटन झाले. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील १२ मार्गासह देशातील २०८ मार्गांवर पूल बांधण्याचा हा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. या योजनेसाठी ५० हजार ८०० कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्यावतीने आज विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात ‘सेतू भारतम्’ योजनेचे उदघाटन झाले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, राज्य मंत्री पोना राधाकृष्णन, सचिव संजय मित्रा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष राघव चंद्रा यावेळी उपस्थित होते.

‘सेतू भारतम्’ या महत्वाकांक्षी कार्यक्रमात महाराष्ट्रातील १२ मार्गावर पूल बांधण्याचे प्रस्तावित आहे. यानुसार राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर भागातील सावनेर-धापेवाडा-कळमेश्वर-गोंडखैरी या मार्गावर पूल बांधण्यात येणार आहेत.

राज्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम भागात उत्तम व सुरक्षित रस्त्यांची सोय करण्यासाठी या कार्यक्रमात भर देण्यात आला आहे. यानुसार गडचिरोली जिल्ह्याच्या मूल भागातील कारंजी-वणी-चंद्रपूर-मूल- या जिल्ह्याची सीमा असणाऱ्या सावळी मार्गावर पूल बांधण्यात येणार आहेत. याच जिल्ह्याच्या वडसा भागातील साकोली- लाखंदूर- वडसा-गडचिरोली- चामोर्शी-आष्टी-सिरोंचा मार्गावर पूल बांधण्यात येणार आहेत.

विदर्भाच्या नागपूर विभागातील उमरेड व भिवापूर आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड व ब्रम्हपुरी भागातील चार मार्गावर पूल बांधण्यासाठी नागपूर-उमरेड-भीवापूर-नागभीड-ब्रह्मपुरी-आरमोरी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. विदर्भाच्या अमरावती विभागातील वाशिम जिल्ह्यातील मार्गावर पूल बांधण्यात येणार आहेत. यात अकोला-वाशिम-हिंगोली-नांदेड- देगलूर आणि आंध्रप्रदेशच्या सीमेवरील मार्गावरील पुलांचा समावेश आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे व कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातही महत्वाच्या मार्गावर पूल बांधण्यात येणार आहेत. यात सांगोला भागातील रत्नागिरी-सांगोला-मंगळवेढा-सोलापूर या मार्गावर तसेच दुधनी भागातील सोलापूर-अक्कलकोट-दुधनी-चौदापूर-गाणगापूर-गुलबर्गा आणि महत्वाच्या सोलापूर-विजापूर मार्गावर पूल बांधण्यात येणार आहे.

या कार्यक्रमांतर्गत राज्याच्या कोकण भागातील रस्ते मार्गावर पूल बांधण्यात येणार आहेत. त्यानुसार रत्नागिरी-सांगोला-मंगळवेढा-सोलापूर मार्गावर पूल बांधण्याचे प्रस्तावित आहे.