लोकसहभाग हाच जलयुक्त शिवारचा आत्मा – जिल्हाधिकारी

0
12

भंडारा : जलयुक्त शिवार ही केवळ सरकारी योजना म्हणून पाहू नये. ही भविष्यकाळातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठीची लोकचळवळ आहे. या योजनेत लोकांचा सहभाग सर्वात महत्त्वाचा असून यावर्षी निवड झालेल्या गावातील प्रत्येक व्यक्तीला पुढच्या पिढीसाठी पाण्याची तरतूद करुन ठेवण्याकरिता मिळालेली ही शेवटची संधी आहे असे समजून यामध्ये सक्रीय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.

जलयुक्त शिवार अभियान 2016-17 मध्ये जिल्ह्यातील 69 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावात जलयुक्त योजनेचे योग्य नियोजन, अंमलबजावणी आणि लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पुणे येथील मनरेगा उपायुक्त बाळासाहेब शिंदे, अकोला येथील जल व मृद संधारण विभागाचे डॉ.एस.एम.टाले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जे. एस. भोर, पवनीच्या मुख्याधिकारी पवनीत कौर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.नलिनी भोयर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात आपल्या पुर्वजांनी आधीच जलयुक्त शिवारचे उत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी अनेक मामा तलावांच्या निर्मितीतून गावातील पाणी गावातच साठवले. तेव्हा कोणतीही सरकारी योजना नव्हती. हे आपले पाणी आहे हे समजून घेऊन त्यांनी पुढच्या पिढीसाठी काम केले. शेकडो वर्षापूर्वी करुन ठेवलेल्या या साठवण तलावांची क्षमता पुनर्जिवित करण्यासाठी मात्र आता लोकांचा सहभाग मिळत नाही ही अतिशय खेदजनक बाब आहे. आपण आता काम केले नाही तर जी परिस्थिती मराठवाड्याची आहे तशी परिस्थिती आपल्या जिल्ह्यात निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. भविष्यातील धोका समजून घेऊन गावातील लोकांनी योग्य नियोजना सोबतच प्रत्यक्ष लोकसहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.नलिनी भोयर यांनी केले. तर संचालन व आभार सोनवने यांनी केले. या कार्यशाळेत सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक कृषी अधिकारी, कृषी सहायक उपस्थित होते.