‘मनुस्मृती’ची विक्री थांबवा अन्यथा हिंसक कृत्य करू- जितेंद्र आव्हाडांचा इशारा

0
13
मुंबई- गेली अनेक वर्षे राज्यात बंदी असलेले ‘मनुस्मृती’ या ग्रंथाची मराठी आवृत्ती बाजारात मिळत असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, पुस्तक विक्रेते व दुकानदारांनी या ग्रंथाची विक्री थांबवावी अन्यथा हा ग्रंथ विकणा-या बुक स्टॉल्स व दुकानांची तोडफोड करू असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी टि्वट करून हा इशारा दिला आहे.
मनुस्मृती हा ग्रंथ जातीयवाद व विषमतेचे समर्थन करतो. त्यामुळे या ग्रंथावर राज्य सरकारने 10 वर्षापूर्वी बंदी घातली होती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्यात या ग्रंथाच्या विक्रीला बंदी घातली. मात्र, आता पुन्हा एकदा मनुस्मृती ग्रंथाची मराठी आवृत्ती बाजारात उपलब्ध करून दिल्याची माहिती पुढे येत आहे. अनेक बुक स्टॉल्सवर व दुकानादारांनी ही आवृत्ती विक्रीला ठेवल्याचे समोर येत आहे.
याबाबतच्या बातम्या समोर येताच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टि्वट करून या ग्रंथावर बंदी असून, त्याची विक्री तत्काळ थांबवावी असा इशारा दिला आहे. आव्हाड यांनी केलेल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की, मनुस्मृती या ग्रंथाची विक्री थांबवावी अन्यथा हिंसक कारवाईला तयार रहा. या ग्रंथाची विक्री करणा-या दुकानाची, बुक स्टॉल्सची तोडफोड करू. हे टि्वट करतानाच आव्हाड यांनी हे पुस्तक मिळत असल्याची दुकानाच्या नावासह एक पावतीच सादर केली आहे.