बोरवेलच्या खड्ड्यात पडला चार वर्षीय विवेक

0
17

गोंदिया, दि. ९ : शेतात खोदण्यात आलेल्या बोअरवेलच्या खड्ड्यात चार वर्षीय बालक पडला. ही घटना सडक अर्जुनी तालुक्यातील राका पळसगाव येथील शेतात बुधवारी (दि. ९) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली. घटना उघडकीस येताच बचावकार्याला गती आली आहे. तालुका प्रशासन घटनास्थळी तळ ठोकून आहे.जेसीबीने बोरवेलच्या आजूबाजुचा परिसर खोदण्यात येत असून दुसरी बोर खोदणारी मशीन सुध्दा बोलावण्यात आली आहे.त्या मशीनने सुध्दा खोदकाम करण्यात येत असल्याची महिती तेथील सुत्रांनी दिली.विवेक खुशाल दोनोडे (रा. राका पळसगाव ) असे खड्ड्यात पडलेल्या बालकाचे नाव आहे.

विवेकची आजी कमलाबाई ही गावालगतच्या शेतात शेळ्या चारण्याकरिता गेली होती. तिच्यासोबत विवेकदेखील होता. आजी कमलाबाई ही शेळ्या चारत असताना विवेक आपल्या वयाच्या दोन मुलांसह खेळत होता. खेळता खेळता तो रामकृष्ण चांदेवार (रा. राका पळसगाव) यांच्या शेतात गेला. रामकृष्ण चांदेवार यांनी शेतात मगळवारी  रात्री ९ वाजताच्या सुमारास बोअरवेलकरिता खड्डा खोदला होता. या खड्ड्यात विवेकने डोकावून पाहिले असता, तोल गेल्याने तो खड्ड्यात पडला. इकडे बराच वेळ होऊनही विवेक दिसून येत नसल्याने आजीने शेळ्या घेऊन गाव गाठले. विवेक दिसत नसल्याचे तिने घरच्यांना सांगितले. दरम्यान, गावातही शोध घेऊन विवेक दिसून आला नाही. त्यामुळे गावकèयांसह कुटुंबियांनी शेतात धाव घेतली. या वेळी तो बोअरवेलच्या खड्ड्यात पडल्याचे समजले. त्यानंतर डुग्गीपार पोलिस ठाण्याला माहिती देण्यात आली. ठाणेदार केंद्रे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीने बोअरवेलचा खड्डा खोदण्यात येत आहे. त्या खड्ड्यात बचाव पथकाच्या माध्यमातून ऑक्सीजनचा पुरवठा विवेकला करण्यात येत आहे. घटनास्थळावर अतिरिक्त पोलीस अधिक्षक डाॅ.संदीप पखाले,उपविभागीय अधिकारी,सभापती कविता रगारी, तहसीलदारांसह वैद्यकीय अधिकारी ब्राम्हणकर, बिडीओ व्ही. झेड.टेंभरे, पोलिस निरिक्षक केंद्रे घटनास्थळी तळ  ठोकून आहेत.