‘एमआयएम’चे आमदार वारीस पठाण निलंबित

0
17

मुंबई- ‘भारत माता की जय‘ अशी घोषणा देण्यास नकार देणारे “मजलिसे इत्तेहदुल मुसलमीन‘चे (एमआयएम) आमदार ऍड. वारीस पठाण यांना आज (बुधवार) अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत बोलताना त्यांनी “भारत माता की जय‘ म्हणणार नाही, असे सांगितले होते. विधानसभेतही याचे तीव्र पडसाद उमटले.

भाजपचे आमदार राम कदम यांनी पठाण यांच्या भाषणात व्यत्यय आणत सरकारवर टीका करतानाच “तुम्ही भारत माता की जय‘ म्हणता का? असा सवाल केला. त्यावर राज्यघटनेनुसार “भारत माता की जय‘ म्हणण्यास बंधन नाही. आम्ही “वंदे मातरम‘ म्हणतो; पण “भारत माता की जय‘ म्हणू शकत नाही, असे वक्तव्य वारीस यांनी केले होते. यामुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेनेचे आमदार खवळून उठले होते. शिवाय, निलंबनाची मागणी केली होती. भारत मातेचा अवमान करणारे असल्याचा ठपका ठेवत अधिवेशन संपेपर्यंत पठाण यांना निलंबित करण्याचा ठराव मांडला. संपूर्ण सभागृहाने या ठरावाला पाठिंबा देत आवाजी मतदानाने तो संमत केला.