पाण्याचा वापर काटकसरीने व जबाबदारीने करा- डॉ. विजय सूर्यवंशी

0
9

गोंदिया दि.१६ :- माणसाला सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टीचे महत्व नसते. पाणी हे सहज उपलब्ध होत असल्यामुळे त्याचे सुध्दा महत्व माहित नाही. भविष्यात पाण्याचा वापर काटकसरीने व जबाबदारीने न केल्यास भीषण जलसंकटाचा सामना करण्याची वेळ येणार आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.
तिरोडा तालुक्यातील धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या वैनगंगा नदी काठावरील कवलेवाडा बॅरेज येथे आज १६ मार्च रोजी जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन जलपूजन करुन डॉ. सूर्यवंशी यांनी केले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला माजी आमदार भजनदास वैद्य, गोसीखुर्द उपसा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रसाद नार्वेकर, पंचायत समिती सभापती उषा किंदरले, उपसभापती डॉ. किशोर पारधी, जिल्हा परिषद सदस्य सर्वश्री मनोज डोंगरे, राजलक्ष्मी तुरकर, कैलास पटले, मिना बिसेन, सुनिता मडावी, प्रिती रामटेके, रजनी कुंभरे, पंचायत समिती सदस्य सर्वश्री प्रवीण मेश्राम, मनोहर राऊत, निता रहांगडाले, माया शरणागत, डॉ. रहांगडाले, पवन पटले, कवलेवाडा सरपंच श्रीमती पारधी, कार्यकारी अभियंता सर्वश्री यासतवार, श्री ढोरे, श्री निखारे, श्री गेडाम, श्री छप्परघरे,उपविभागीय अधिकारी  महिरे, तहसिलदार श्री चव्हाण, नायब तहसिलदार श्री कोकवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सूर्यवंशी पूढे म्हणाले, संयुक्त राष्ट्रसंघाने २२ मार्च हा जलदिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले. यावर्षीच्या जलदिनाची संकल्पना पाणी आणि नोकरी यावर आधारीत आहे. जगातील १५० कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या ही पाण्याशी संबंधित व्यवसायाशी निगडीत आहे.
जिल्हयात सिंचनातून कृषी क्रांती घडविण्याची क्षमता धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात आहे असे सांगून डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ही सिंचन क्षमता पूर्ण होताच जिल्हयातील १ लाख पेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येणार आहे. शेतकऱ्यांनी सिंचनाच्या सुविधा लक्षात घेता नगदी पिकाकडे वळणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे बीलसुध्दा वेळेत भरले पाहिजे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.प्रास्ताविकातून बोलतांना श्री नार्वेकर म्हणाले, जनतेचे जलप्रबोधन करण्यासाठी १६ ते २२ मार्च दरम्यान जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाला विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी तसेच कवलेवाडा परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी मनोज दाढी व त्यांच्या कलावंतांनी जलजागृतीपर पथनाट्य सादर करुन जलसाक्षरतेचा संदेश दिला. संचालन दुलीचंद बुध्दे यांनी केले. उपस्थितांचे आभार विलास पाटील यांनी मानले.