शेतकरी आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा- विरोधकांची मागणी

0
5


मुंबई – मंत्रालयाच्या दारात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे संतप्त विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उडविली.परिणामी, राजकारण तापण्याचे संकेत असून, सोमवारी (ता. 28) विधिमंडळात या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपूर्ण कर्जमाफी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर 302 कलमांतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. 

सलग दोन वर्षे दुष्काळाचे अनुदान मिळाले नाही, म्हणून नांदेडच्या माधव कदम या तरुण शेतकऱ्याने सरकारच्या निषेधार्थ बुधवारी मंत्रालयाच्या दारात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अत्यवस्थ स्थितीत त्यांना जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज दुपारी त्यांचा मृत्यू झाला.

सरकार दुष्काळाचा निधी देत नसल्याने मागील वर्षीदेखील माधव कदम यांनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध करत विषप्राशन करून आत्मत्येचा प्रयत्न केला होता. पण त्यानंतरही सरकारने त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचे आश्‍चर्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारवर टीका करत, कर्जमाफीसाठी सरकार किती वाट पाहणार आहे, असा सवाल केला.
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांवर आता 302 चा गुन्हा का दाखल करू नये, असा सवाल केला.