वाहतूक पोलिसाची दादागिरी;सीएला बेदम मारहाण

0
12

नागपूर : हेल्मेट का घातले  नाही म्हणून एका सी.ए. असलेल्या तरुणाशी वाद घालून त्याला वाहतूक शाखेच्या पोलिसाने बेदम मारहाण केली. प्रकरण एवढ्यावरच न थांबवता  त्याला शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली अटकही केली.  पंकज घनश्याम ठाकूर (वय २९) असे पोलिसांनी आरोपी बनविलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांच्या दादागिरीची सर्वच स्तरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

 शनिवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास पंकज त्याच्या काकांना घेऊन दुचाकीने जरीपटक्यातून जात होता. जरीपटका पोलीस ठाण्यासमोरच्या चौकातील सिग्नलवर तो थांबला असता त्याला वाहतूक शाखेच्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने हेल्मेट का घातले नाही, अशी विचारणा केली. त्यानंतर बाजूला उभे असलेल्या दोन पोलीस आणि एका अधिकाऱ्याकडे त्याला पाठविले. दुचाकीची चावी काढून कागदपत्रे मागितल्यामुळे पंकजने ती कागदपत्रे पोलिसांना दिली.

 पोलीस शिपाई अमरदीप गोवर्धन सोळंके (वय ३४) असे त्या पोलिसाचे नाव आहे. त्याने पंकजला अरेरावीने विचारपूस केली. त्यामुळे पंकजने आपण सीए आहोत, आपल्यासोबत सभ्य भाषेत बोला, असे म्हटले. परंतु, सोळंके पंकजसोबत वाद घातला आणि त्याच्या कानशिलात लगावली. पंकजसोबत झोंबाझोंबी झाल्यामुळे सोळंके खाली पडला. त्यामुळे त्याला जास्तच ताव आला. त्याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बाजूलाच असलेल्या जरीपटका ठाण्यात नेऊन त्याची बेदम धुलाई केली.

त्याच्यावर अश्लील शिवीगाळ करून सोळंकेला मारहाण केल्याचा आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले. त्यानंतर जामिनावर तो बाहेर आला. दरम्यान,आपला काही दोष नसताना पोलिसांनी आपल्याला एखाद्या गुन्हेगारासारखे बदडले. पोलिसांच्या हा गुंडगिरीचा प्रकार ठाण्यातील सीसीटीव्हीत कैद झाला असून, वरिष्ठांनी तो तपासावा आणि दोषी पोलिसांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पंकजने एका निवेदनातून केली आहे.