शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे भूमिपुजन मे महिन्यात

0
11

मुंबई : जगातील सर्वात उंच अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे भूमिपुजन मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून या स्मारकाचे काम 40 महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कफ परेड भागात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारणीच्या कामासाठी स्थापन करण्यात आलेल्या क्षेत्रीय कार्यालय व आपत्कालीन कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, ग्रामविकास, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे, आमदार भारती लव्हेकर, विजय सावंत, अपर मुख्य सचिव पी.एस. मीना आदी उपस्थित होते.

या आपत्कालीन कक्षाविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आवश्यक आणि अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असा हा कक्ष अत्यंत उपयुक्त आहे. या स्मारकाच्या कामासाठी आवश्यक अशा सर्व परवानग्या केवळ एका वर्षात घेण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून भूमिपुजनाचा कार्यक्रम मे महिन्यात करण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांचा कारभार जसा नियोजित होता त्याचप्रमाणे शिवस्मारकाचे कामदेखील नियोजित वेळेत पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री.मेटे म्हणाले, शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे स्वप्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पूर्ण होत आहे. हा आपत्कालिन कक्ष केवळ दहा दिवसात उभारण्यात आला असून या कक्षासाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रणेच्या माध्यमातून टीम काम करणार आहे.