ग्राम उदय से भारत उदय अभियानात सहभागी होऊन ग्रामविकासाची चळवळ गतिमान करावी- पंकजा मुंडे

0
5

14 ते 24 एप्रिल दरम्यान ‘ग्राम उदय से भारत उदय अभियान’

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल २०१६ रोजी १२५ वी जयंती तर २४ एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिन आहे. या पार्श्वभूमीवर १४ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान ‘ग्राम उदय से भारत उदय अभियान’ राबविण्याचे भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने निश्चित केले आहे. महाराष्ट्रातही ग्रामविकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागामार्फत विविध उपक्रम राबवून हे अभियान साजरे केले जाणार आहे. या अभियानात ग्रामीण भागातील नागरिकांनी सहभागी होऊन ग्रामविकासाची चळवळ गतिमान करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.

सामाजिक सलोखा व अभिसरण वृद्धिंगत करणे, पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण करणे, शेतकऱ्यांचा विकास करणे आणि गरीबांचे जीवनमान उंचावणे हे या अभियानाचे प्रमुख उद्देश आहेत. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये हे अभियान राबविण्यात येणार असून यासाठी ग्रामविकास विभागाने ११ दिवसांचा एक कार्यक्रम तयार करुन दिला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींनी या ११ दिवसांत निश्चित केलेले विविध कार्यक्रम आपापल्या गावांमध्ये प्रभावीपणे राबवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणारा शासन निर्णय ग्रामविकास विभागामार्फत दि. ६ एप्रिल २०१६ रोजी काढण्यात आला असून तो शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

या अभियानांतर्गत १४ एप्रिल ते १६ एप्रिल दरम्यान सामाजिक सलोखा व अभिसरण कार्यक्रम, दि. १७ ते २० एप्रिलदरम्यान ग्रामकिसान सभांचे आयोजन तर दि. २१ ते २४ एप्रिलदरम्यान राष्ट्रीय पंचायत दिनाचे औचित्य साधून ग्रामसभांचे आयोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

सामाजिक सलोखा व अभिसरण कार्यक्रमांतर्गत सर्व ग्रामपंचायतींमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहणे, बाबासाहेबांचे कार्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी त्यांच्या योगदानाबाबत लोकांना माहिती करुन देणे, सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी समरसता व सद्भावनेची शपथ घेणे, ग्रामस्थांना सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती देणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

दिनांक १७ ते २० एप्रिल या कालावधीत ग्रामकिसान सभा कार्यक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये शेतकऱ्यांच्या बैठका आयोजित करण्यात येणार असून या बैठकीत शेतकऱ्यांना कृषीविषयक योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच कृषीविषयक सुधारणांबाबत संबंधित शेतकऱ्यांची मते प्राप्त करण्यात येतील. २१ ते २४ एप्रिल या कालावधीत राष्ट्रीय पंचायत राज दिन साजरा करण्याच्या हेतूने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. २४ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व ग्रामसभांना संबोधित करणार असून त्यांचे संभाषण सर्व ग्रामस्थांना एकत्रितपणे ऐकता येण्यासाठी दूरचित्रवाणी, रेडिओ उपलब्ध करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

या अभियानाच्या राज्यस्तरीय नियोजनासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुकाणू समिती तर प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या अभियानामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार करणे, शेतकऱ्यांना कृषी तंत्राविषयी माहिती देणे, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे, मेळावे, क्रिडा स्पर्धा आदींचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी किमान एका ग्रामसभेस उपस्थित राहून लोकांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.