मुंबईत २९ हजार पोलीस छपराविना

0
8

मुंबई : राज्यातील सुमारे अकरा कोटींहून अधिक जनतेच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करून राज्यात कायदा व सुव्यवस्था चोवीस तास राखण्याची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. त्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांपैकी तब्बल १ लाख २0 हजार ४४७ पोलीस शासकीय निवासापासून वंचित आहेत. राज्यकर्ते ज्या मुंबईत बसून राज्याचा कारभार हाकतात त्या राज्याच्या राजधानी व आंतररष्ट्रीय ख्यातीच्या मुंबईत कार्यरत असलेल्या ५0 हजार पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांपैकी तब्बल २९ हजार पोलीस शसकीय निवासापासून वंचित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

राज्यात ३१ जानेवारी २0१६ अखेरपर्यंत १७ हजार ९0 पोलीस अधिकारी, तर १ लाख ८९ हजार ८७२ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी ५६६५ अधिकार्‍यांना, तर ८0,८५0 कर्मचारी अशा एकूण ८६ हजार ५१५ अधिकारी व कर्मचार्‍यांना शासकीय घरे मिळाली आहेत. तर अधिकार्‍यांपैकी अजूनही ११ हजार ४२५ व कर्मचार्‍यांपैकी १ लाख ९ हजार २२ अशा एकूण १ लाख २0 हजार ४४७ जणांना शासकीय निवासस्थाने मिळू शकलेली नाहीत.

मुंबईसारख्या चोवीस तास घडामोडी घडणार्‍या शहरात कार्यरत असलेल्या पन्नास हजार पोलिसांपैकी तब्बल २८ हजार ९९५ पोलिसांना अजूनही शासकीय निवाराछत्र लाभलेले नाही. त्यामुळे त्यांना नोकरीच्या ठिकाणापासून दूरवर राहण्याची सोय करावी लागली आहे. मुंबई पोलीस दलात ५८0२ अधिकारी, तर ४४,६९३ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी १९५0 अधिकार्‍यांना, तर १९५५0 कर्मचार्‍यांना राहण्यासाठी शासकीय निवासस्थाने मिळाली आहेत.