लातूरकरांना ‘जलदूत’द्वारे पाच कोटी लिटर पाणी

0
7

मुंबई दि.6 : लातूर शहरातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन राज्य  शासनाने तातडीची उपाययोजना म्हणून रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा घेतलेला निर्णय लातूरकरांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि मदतीचा ठरला आहे. जलदूत या विशेष रेल्वेगाडीने आतापर्यंत 27 फेऱ्यांद्वारे एकूण 4 कोटी 95 लाख लिटर पाणी लातूरकडे रवाना झाले आहे. लातूरच्या पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी प्रसंगी रेल्वेने पाणीपुरवठा करु, या आश्वासनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्याने पूर्तता केली आहे.

आज सायंकाळी सांगली जिल्ह्यातील मिरज येथून 25 लाख लिटर पाणी घेऊन रेल्वेची 27 वी फेरी रवाना झाली. ही रेल्वे लातूरला पोहोचताच सुमारे पाच कोटी लिटर पाण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले जाईल. मराठवाड्यातील दुष्काळी  परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि तेथील जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या मंत्रिमंडळाने या भागाचा दौरा केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली लातूर येथे झालेल्या विशेष बैठकीत उपाययोजनांबाबत चर्चा झाला. आवश्यकता भासल्यास लातूर शहरासाठी रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले होते. त्यानंतर परिस्थितीचा विस्ताराने आढावा घेऊन लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

लातूर येथील रेल्वे स्थानक परिसराची पाहणी करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष घालून केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर लातूरला मिरजहून रेल्वेने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मिरज येथून 10 वॅगनने 5 लाख लिटर पाणी घेऊन पहिली रेल्वे 12 एप्रिल रोजी पोहोचली. यापद्धतीने 9 दिवस 45 लाख लिटर पाणी पोहोचवण्यात आले. त्यानंतर 20 एप्रिलपासून 50 वॅगनने 25 लाख लिटर पाणी
नेण्यास सुरुवात झाली. लातूर शहरासाठी रेल्वेने आजवर 4 कोटी 70 लाख लिटर पाणी देण्यात आले असून आजच 25 लाख लिटर पाणी घेऊन 27 वी फेरी मिरजहून लातूरला रवाना झाली आहे. ही रेल्वे उद्या (दि.7) सकाळी लातूरला पोहोचणार आहे.

या पाण्याच्या वितरणासाठी लातूर महानगरपालिकेने टँकरची व्यवस्था केली आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा स्थानिक प्रशासनाशी संपर्क ठेवून मुख्यमंत्र्यांकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे. पाणी वितरण
प्रक्रियेची मिनिट टू मिनिट माहिती प्राप्त होण्यासाठी प्रत्येक टँकरला जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच पाणी वितरणाच्या वेळी संबंधित प्रभागातील रहिवाशांच्या प्रातिनिधिक स्वरुपात सह्याही घेतल्या जात आहेत.

जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाने अहोरात्र परिश्रम घेऊन रेल्वेने येणारे पाणी उतरवून घेणे, त्याची जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत वाहतूक करणे आणि तेथून शहरात त्याचे वितरण
करणे या बाबींसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांची उभारणी केली. त्यात पाणी साठविण्यात येणाऱ्या विहिरीची स्वच्छता आणि डागडुजी, रेल्वे टँकरमधील पाणी साठवण विहिरीपर्यंत वाहून नेण्यासाठी सुमारे 800 मिटर लांबीची पाईपलाईन अंथरणे, पाणी वाहतुकीसाठी टँकर पॉईंटची उभारणी करणे, विहिरीपासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी सुमारे 3  किलोमिटर लांबीची पाईपलाईन अंथरणे आणि पाणी उपशासाठी विहिरीवर 12 मोटारी बसविणे तसेच त्यांच्या वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र फिडर उभारणे अशा बाबींचा समावेश आहे.