‘जलयुक्त शिवार’ आदर्श मॉडेल – राजेंद्रसिंह राणा

0
9
मुंबई – जलयुक्त शिवार योजनेसाठी महाराष्ट्रात लोकवर्गणी, श्रमदान आदी माध्यमातून लोकांचा चांगला सहभाग लाभला आहे. सरकार आणि लोकांच्या सहभागाचे “जलयुक्त शिवार‘ अभियान हे एक आदर्श मॉडेल आहे, असे प्रतिपादन जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

कृषी, जलसंधारण, बांधकाम, मनरेगा आदी विभागांतील जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचे आज मंत्रालयातील परिषद सभागृहात जलसंधारण विभागामार्फत आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी राज्याच्या ग्रामविकास आणि जलसंधारणमंत्री पंकजा मुंडे, जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख आदी उपस्थित होते.

राजेंद्रसिंह म्हणाले की, कोणतीही योजना ही लोकांच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. महाराष्ट्रातील भौगोलिक विविधता पाहता जलसंधारणाची कामे करत असताना त्याला स्थानिक परिस्थितीनुरूप स्वरूप देणे गरजेचे आहे. जलयुक्त शिवार अभियान राबविताना “माथा ते पायथा‘ या धोरणानुसार जलसंधारणाची कामे करण्यात यावीत. याशिवाय नदी खोऱ्याला केंद्रिभूत मानून जलसंधारणाची कामे करण्यात यावीत. राज्य सरकारने हाती घेतलेला नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमही आदर्श असून, तो प्रभावीपणे राबविण्यात यावा, असे आवाहन त्यांनी केले. जलयुक्त शिवार आणि नदी पुनरुज्जीवन अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पाणीप्रश्नावर सकारात्मक तोडगा निघू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘जलयुक्त‘मधील पाणी जबाबदारीने वापरावे लागेल – मंत्री पंकजा मुंडे 
ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, राज्यात जलयुक्त शिवार अभियानातून जलसंधारणाची साधारण एक लाख 69 हजार कामे पूर्ण झाली आहेत. याशिवाय साधारण 34 हजार 900 कामे प्रगतिपथावर आहेत. हवामान खात्याने यंदा चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या कामातून यंदा चांगला पाणीसाठा निर्माण होईल, असा विश्वास आहे. पण त्यानंतर हे पाणी जबाबदारीने वापरण्याचे मोठे आव्हान आपणासमोर आहे.