भेंडवळमधील भविष्यवाणीनुसार यंदा चांगला पाऊस

0
11

बुलडाणा, दि.१० –  विदर्भासह संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकºयांना पीक-पाण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक ठरणाºया सुप्रसिध्द भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत आज १० मे रोजी पहाटे ३ वाजता चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज व त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी जाहीर केले. भरपूर पावसाळा,  पीक परिस्थिती चांगली पण पिकांची नासाडी, अवकाळी पाऊस नसला तरी चारा टंचाईचे संकट राहील. राजा कायम असला तरी त्याच्यावर संकट राहील, देशाच्या सीमेवर घुसखोरी हाईल अशा अनेक भाकितांमुळे पुढील वर्षाचे कृषीक्षेत्र तसेच देशाची स्थितीही कशी  राहिल याचा अंदाज या भाकितांमधून व्यक्त करण्यात आला. यावेळी हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते.

अक्षय तृतीयेच्या संध्येला गावाबाहेरील शेतात पुंजाजी महाराज, सारंगधर महाराज हे आपल्या अनुयायांसह आले. चंद्रभान महाराज की जय म्हणत त्यांनी मातीचा गोल घट तयार केला. घटात मध्यभागी खोल खड्डा खोदून त्यामध्ये पावसाळ्याचे प्रतिक म्हणून चार मातीची मोठी टेकडे ठेवण्यात आली. त्यावर समुद्राचे प्रतिक असलेली पाण्याने भरलेली घागर, घागरीवर पृथ्वीचे प्रतिक पुरी त्यावर गुराढोरांच्या चारापाण्याचे द्योतक सांडोळी, कुरडई आणि पापड ठेवला तसेच मांडणीमध्ये अर्थव्यवस्थेचे प्रतिक समजली जाणारी करंजीही (कानोला) पुरीवर ठेवलेली असते. त्यानंतर खड्यात एका बाजूला विड्याचे पान म्हणजे राजाची गादी आणि त्यावर लाल सुपारी म्हणजे देशाचा राजा असतो. त्यानंतर गोल घटात अंबाडी, सरकी (कपासी), ज्वारी, तुर, मूग, उडीद, तीळ, भादली, बाजरी, तांदुळ, जवस, लाख, वटाणा, गहू, हरभरा, करडी आणि मसूर ही एकंदर १८ धान्ये गोलाकार ठेवण्यात आली. त्यामध्ये अंबाडी हे धान्य कुलदैवत, मसूर हे शत्रू तर करडी हे धान्य देशाच्या अर्थव्यवस्थेचे आणि भादली हे धान्य पिकवरील रोगराईचे द्योतक समजले जाते. ही मांडणी करुन परत गेल्यानंतर रात्रभर कुणीही या शेताकडे फिरकत नाही. त्यानंतर पहाटे येवून चंद्रभान महाराजांचा जयजयकार करीत या घटात झालेले बदल लक्षात घेवून महाराजांनी आज यंदाचे भाकीत जाहीर केले. भाकीत जाहीर करताना त्यामध्ये पारावरच्या मांडणीचाही आधार घेण्यात आल्या दोन्ही मांडणीची भाकीते एकमेकांशी साधर्म्य साधणारी होती.