पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करून राज्याचा चेहरा-मोहरा बदलणार- मुख्यमंत्री

0
12

मुंबई : राज्यात मेट्रो, ट्रान्सहार्बर सी-लिंक, कोस्टल रोड, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे असे महत्त्वाचे पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू असून येत्या चार वर्षात ते पूर्ण करून राज्याचा चेहरा मोहरा बदलू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

इंडियन मर्चंट चेंबरच्या वतीने चर्चगेट येथे आयोजित ‘रिसर्जंट इंडिया – महाराष्ट्र लिडस् द वे’ या कार्यक्रमात श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, चेंबरचे अध्यक्ष दिलीप पिरामल, दीपक प्रेमनारायण, चेंबरच्या महिला विभागाच्या अध्यक्षा शालिनी पिरामल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, जगाचे लक्ष भारताच्या अर्थव्यवस्थेकडे लागले आहे. देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या भारताकडे असून या मनुष्यबळाकडे जगाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे पुढील काळात जगाला कुशल मनुष्यबळ पुरविण्याची जबाबदारी भारताकडे आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही महत्त्वपूर्ण सहभाग असणार आहे.

एका वर्षाच्या काळात राज्य शासनाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सर्व परवाने मिळविले असून 3 महिन्यात याचे काम सुरू होईल. या विमानतळावरून 2019 मध्ये पहिले विमान उडालेले तुम्हाला दिसेल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन वे मुळे 20 जिल्ह्यांना फायदा होणार असून हा महामार्ग जालना व वर्धा ड्राय पोर्ट यांना जवाहरलाल नेहरू पोर्ट (जेएनपीटी) बरोबर जोडणारा आहे. यामुळे नागपूर ते जेएनपीटी हा प्रवास आठ तासात तर औरंगाबाद ते जेएनपीटी हा प्रवास चार तासात होणार आहे. यातून उत्पादन क्षेत्राची वाढ होऊन मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.