बेलाझ डम्प ट्रक्स सर्व्हीस सेंटरमुळे रोजगाराची नवी दालने खुली – डॉ.मिखाईल मॅसनीकोविच

0
9

नागपूर : मुल्य, गुणवत्ता आणि सेवा या त्रिसुत्रीवर बेलाझ कंपनी उभी आहे. बेलाझ कंपनीने नागपूर येथे डम्प ट्रक्सचे सर्व्हीस सेंटर, प्रशिक्षण तसेच डम्प ट्रक्सच्या सुट्या भागांची विक्री व दुरुस्ती केंद्र स्थापन केले आहे. भारत आणि बेलारुस या उभय देशांत रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊन यामुळे दोन्ही देशात सलोख्याचे संबंध निर्माण होईल, असे मत बेलारुस गणराज्य परिषद संसदेचे अध्यक्ष डॉ.मिखाईल मॅसनीकोविच यांनी व्यक्त केले.

जामठा स्टेडियमजवळील बेलाझ डम्प ट्रक्स सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन आज डॉ. मिखाईल मॅसनीकोविच यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

‘बेलाझ’ ही कंपनी महाकाय व जडवाहतूक करणारे शक्तिशाली ट्रक्सची निर्मिती करते. या शक्तिशाली ट्रक्समुळे 50 ते 500 टनापर्यंत जड वस्तूंची वाहतूक करता येते. भारताची वाटचाल एका उद्योगप्रधान देशाकडे होत असतांना अशा शक्तिशाली ट्रक्सची मदत मोठ-मोठ्या उद्योगधंद्यांच्या कच्च्या तसेच पक्क्या मालाच्या वाहतूक वस्तू तसेच यंत्र सामुग्रीची दळणवळण करणे सुलभ झाले आहे.

यावेळी बेलारुस गणराज्य परिषद संसदेचे उद्योग मंत्री विटाली वोवक, मिन्स्कचे विभागीय कार्यकारी स्थायी समितीचे अध्यक्ष सेमॉन शापीरो, परराष्ट्र व्यवहार आणि राष्ट्रीय सुरक्षा स्थायी समितीचे अध्यक्ष वल्दीमीर सेन्को, शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि सामाजिक विकासाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष निकोल कजारोव्हेट्स, शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि सामाजिक विकासाच्या स्थायी समितीचे उपाध्यक्ष तमारा डोलगोशे, परराष्ट्र व्यवहार आणि राष्ट्रीय सुरक्षा स्थायी समितीचे सदस्य युरी कोजीयातको, शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि सामाजिक विकासाच्या स्थायी समितीचे सदस्य मरत झीलीन्स्की, व्यापार व उद्योग इंडस्ट्रीचे अध्यक्ष मीखाइल मॅत्लीकोव्ह तसेच बेलाझ डम्प ट्रक्स सर्व्हीस सेंटरचे संचालक नयन जगजीवन, मुख्य कार्यकारी अधिकारी समर शकील, तांत्रिक विभाग प्रमुख प्रभाकर कोहळे, वित्तविभाग प्रमुख चिराग भट तसेच विधीमंडळाचे सहसचिव महेंद्र काज, सभापतींचे अवर सचिव सुनिल झोरे हे उपस्थित होते.

डॉ.मिखाईल मॅसनीकोविच म्हणाले, नागपूर हे शहर मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे वाहतुकीच्या माध्यमातून देशाला जोडले गेले आहे. यामुळे सर्वप्रथम नागपूरला बेलाझ सर्व्हीस सेंटर स्थापन करण्यात आले आहे. कोळसा खाण पट्टा इत्यादी उद्योगांमध्ये बेलाझ ट्रक्सचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. यामुळे येथेच दुरुस्ती व देखभाल केंद्र असल्यास सोयीचे ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी बेलारुस तसेच भारत या दोन्ही देशाच्या प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या करुन बेलाझ डम्प ट्रक्स सर्व्हीस सेंटरची मुर्हतमेढ रोवली. कार्यक्रमाचे संचालन निरंजन देशकर तर आभार प्रभाकर कोहळे यांनी मानले.