यंचलित हवामान केंद्र उभारणीस गती देऊन लवकर प्रक्रिया पूर्ण करावी – मुख्यमंत्री

0
8

मुंबई : राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून राज्यात महसूल मंडळ स्तरावर 2 हजार 65 स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीच्या प्रस्तावास गती देऊन ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कृषी विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषी राज्यमंत्री राम शिंदे, कृषी व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.भगवान सहाय, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव के.पी.बक्षी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी.के.जैन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, पदुमचे प्रधान सचिव विजय कुमार, दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.तपस भट्टाचार्य, परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.वेंकटेश्वरलू, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.के.पी.विश्वनाथ, अकोला कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.रविप्रकाश दाणी आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या हितासाठी ही प्रक्रिया लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. या प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून या माध्यमातून दैनंदिन पर्जन्यमान, कमाल व किमान तापमान, हवेचा दाब, वाऱ्याचा वेग व दिशा या घटकांच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत. तसेच कृषी संशोधन, हवामानाचा अचूक अंदाज, आपत्ती व्यवस्थापन, हवामानाचे कमी कालावधीसाठी स्थानिक पुर्वानुमान निश्चित करण्यासाठीही उपयोग होणार आहे. हा प्रकल्प वेळेत उभारणीसाठी कालबद्ध नियोजन करुन पूर्ण करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.