पाणी पुरवठ्याच्या वेळात वीज पुरवठा होणार खंडीत

0
10

गोंदिया,दि.१९ : गोंदिया आणि तिरोडा शहरातील अनेक कुटुंबांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने नळ कनेक्शनद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. या दोन्ही शहरात पाणी पुरवठ्याच्या काळात अनेक कुटुंब थेट नळाला टिल्लू मोटरपंप लावून पाण्याचा उपसा करीत असल्यामुळे इतर नळ कनेक्शनधारकांना पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येत होती. त्यामुळे त्यांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत होती. याबाबतच्या त्यांच्या तक्रारींची दखल जिल्हा प्रशासनाने व नगरपालिकेने घेतली असून आता या दोन्ही शहराला पाणी पुरवठ्याच्या सकाळी ६.३० ते सकाळी ७.३० या वेळेत वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता गणवीर यांनी चर्चेअंती घेतला आहे. त्यामुळे आता २० मे पासून सर्व नळ कनेक्शन धारकांना सारख्या प्रमाणात पाणी मिळण्यास मदत होईल. कोणतेही नळ कनेक्शनधारक कुटुंब पाण्यापासून वंचित राहणार नाही. ३० जून पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा वैनगंगा नदी पात्रात असल्यामुळे एक वेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.