पुलगाव दुर्घटनाग्रस्तांना एक कोटी ३ लाख रुपयांची मदत

0
8

मुंबई : वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील दारुगोळा भांडाराला लागलेल्या आगीत मृत पावलेल्या तसेच जखमी व्यक्तींच्या परिवाराच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या १८ जणांच्या कुटुंबियांच्या वारसांना राज्य शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये तर १३ जखमींना प्रत्येकी १ लाख रुपये याप्रमाणे एकूण १ कोटी ३ लाख रुपयांची मदत करण्यात येत असल्याचे त्यांनी आज सांगितले.

मुख्यमंत्री सहायता निधीतून ही रक्कम जिल्हाधिकारी, वर्धा यांच्या बँक खात्यात यापूर्वीच वर्ग करण्यात आली होती. जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडून आज दुर्घटनाग्रस्तांना मदतीचे धनादेश वाटताना मुख्यमंत्र्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीडित कुटुंबियांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार राज्य मंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संपूर्ण राज्य तसेच देश आपल्या सर्व शोकाकूल परिवारांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, या दुर्घटनेत ज्या कुटुंबाने त्यांची जीवलग व्यक्ती गमावली त्याची भरपाई ही कितीही मोठी रक्कम दिली तरी होऊ शकत नाही. परंतु, शासन या सर्व परिवाराचे जीवन सुकर करण्यासाठी निश्चित मदत करेल, जिल्हाधिकारी, वर्धा यांच्यामार्फत त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या दूर केल्या जातील, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

अग्निशमन दलाचे जवान अमीत दांडेकर या दुघर्टनेत शहीद झाले त्यांच्या पत्नी श्रीमती प्राची अमीत दांडेकर यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांशी बोलतांना आपले पती हे शहीद झाले, सेवा बजावताना अमर झाले, त्याचा मला अभिमान आहे, अशी भावना व्यक्त केली. यावेळी त्यांना आपले अश्रू अनावर झाले तेव्हा संपूर्ण सभागृह हेलावून गेले.

श्रीमती दांडेकर यांचे सांत्वन करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना काळजी करू नका, संपूर्ण राज्य तसेच देश आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. दुर्घटनाग्रस्त परिवाराच्या समस्या जिल्हाधिकारी वर्धा यांनी समजून त्या नोंदवून घ्याव्यात, असे निर्देश देऊन वित्तमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, या दुर्घटनेत संरक्षण दलातील जे अधिकारी आणि जवान शहीद झाले त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासंदर्भात वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण संरक्षणमंत्र्यांना पत्र देऊ तसेच मुख्यमंत्री ही यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करतील.

दुर्घटनेच्या दिवशी आपण वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे व सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह पुलगावला भेट दिली असून तेथील अग्निशमन यंत्रणा सज्ज करण्याबरोबरच पुलगाव भांडाराकडे जाणारे रस्ते उत्तम करण्याच्या सूचना दिल्याचेही वित्तमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पुलगाव दुर्घटनेमुळे आसपासच्या पाच गावामध्ये जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे करून त्यांनाही नुकसानभरपाई देण्याच्यादृष्टीने अहवाल तयार करत असल्याचे वर्धा येथील जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यावेळी सांगितले.