राज्यभरात आजपासून सोनोग्राफी बंद

0
5

पुणे : मागील ६ दिवसांपासून पुण्यात बेमुदत बंद असलेली सोनोग्राफी सोमवारपासून (दि. २०) राज्यभरात बंद होणार आहे. त्यामुळे सोनोग्राफी आणि एक्स-रेच्या आंदोलनाला व्यापक स्वरुप प्राप्त होण्याची शक्यता आहे़ गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्यातील अन्यायकारक तरतुदींच्या आधारावर पुण्यातील रेडिओलॉजिस्टवर केलेल्या अन्यायकारक कारवाईचा निषेध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला असून आता तो संपूर्ण राज्यात चालू होणार आहे.

राज्यभरातील रेडिओलॉजिस्ट संपावर विविध मागण्यांसाठी १४ जून रोजी गेले होते. त्यानंतर पुण्यातील रेडिओलॉजिस्टनी बेमुदत संप केला होता. मात्र अद्यापही त्यांच्या मागण्यांना शासकीय स्तरावरुन कोणतेही ठोस उत्तर मिळाले नसल्याने सोमवारपासून हा संप राज्यस्तरीय होत असल्याचे इंडियन रेडिओलॉजिस्ट अँड इमेजिंग असोसिएशनतर्फे सांगण्यात आले.

याबाबत संघटनेचे राज्याचे अध्यक्ष डॉ. जिग्नेश ठक्कर म्हणाले, केवळ कारकुनी त्रुटींच्या आधारावर रेडिओलॉजिस्टवर अन्यायकारक कारवाई करणाऱ्या प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या तत्काळ बदलीची आणि पीसीपीएनडीटी कायद्यात तातडीने सुधारणा व्हाव्यात, यासाठी हा संप पुकारण्यात येत आहे. पुण्यातील बेमुदत आंदोलनाला शासनाकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने या आंदोलनाला राज्यस्तरीय स्वरुप आले असून हा बंदही बेमुदत चालू राहणार आहे.