राज्यभरात ३ हजारावर पोलीस कर्मचारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या घरी कामावर

0
5

नागपूर :- :-स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या घरी पोलीस खात्यातील अनेक कर्मचाऱ्यांना घरकाम, बागकाम आणि देखरेखीच्या कामावर ठेवण्यात येत होते. अजूनही हे चित्र बदलले नसून राज्यभरातील जवळपास ३ हजारांवर पोलीस कर्मचारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या घरी घरगडीसारखे काम करीत आहेत.

पोलीस दलात भरती होण्यासाठी लेखी परीक्षा उत्तीर्ण करून ९ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. राज्याची सेवा करण्याचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून तरुण पोलीस दलात भरती होतात. परंतु, प्रशिक्षण पूर्ण होताच काही कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या घरी सुरक्षेच्या नावावर तैनात केले जाते. परंतु, त्यांच्याकडून बागकाम, देखरेख, कुटुंबीयांना बाजारात नेणे, मुलांना शाळेत सोडणे, घरातील कुत्र्याला फिरवायला नेणे, गायी-म्हशीची निगा राखणे, किराणा आणून देणे, अशी कामे करून घेतली जातात. ही बाब एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला खटकल्याने त्यांनी या विरोधात थेट न्यायालयाचे दार ठोठावले आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

राज्य पोलीस दलातील १२ पोलीस आयुक्तालये आणि ३४ जिल्हा अधीक्षक कार्यालयात जवळपास ६०० वर वरिष्ठ अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्याकडे ३ हजारांवर पोलीस कर्मचारी घरकामासाठी नियुक्त केले जातात. अशा कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक दिली जाते. त्यामुळे वरिष्ठांच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

जनहित याचिकेमुळे विषय ऐरणीवर

महाराष्ट्र पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रकुमार त्रिवेदी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून पोलीस कर्मचाऱ्यांना घरगडी ठेवण्याचा प्रकार समोर आणला आहे. न्यायालयाने या जनहित याचिकेची गांभीर्याने दखल घेतली आहे. एकट्या मुंबई शहरात १२७ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सेवेसाठी २९४ पोलीस नियुक्त केल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली आहे.

शहर आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या घरी पोलीस कर्मचारी सुरक्षारक्षक म्हणून तैनात आहेत. त्यांच्याकडून घरगुती कामे करवून घेतली जात नाहीत.
➖आश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त, पोलीस मुख्यालय.