यावर्षी मान्सून समाधानकारक राहणार;स्कायमेटचा अंदाज

0
3

नवी दिल्ली:- मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा मान्सूनमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता, त्यामुळे अनेक भागात सध्या पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागात पाण्याची समस्या आहे. मात्र, यंदाच्या मान्सूनमध्ये यापासून दिलासा मिळणार आहे. कारण, यंदा मान्सूनमध्ये चांगला आणि सरासरीप्रमाणे सामान्य पाऊस होण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

स्कायमेट वेदर या हवामानाचा अंदाज देणाऱ्या संस्थेच्या अहवालानुसार, यंदा समाधानकारक मान्सून पाहायला मिळेल. यंदा पावसाळ्यात पर्जन्यमान चांगलं राहणार आहे. नेहमीच्या सरासरी च्या 102 टक्के म्हणजे सर्वसाधारण पाऊस पडेल, असा स्कायमेट वेदरने वर्तवला आहे. एल निनोचं ला निनो मध्ये रुपांतर होत असल्याने महाराष्ट्राच्या अवर्षणग्रस्त भागातही चांगल्या पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. मान्सून फोरकास्ट 2024′ या शीर्षकाच्या अहवालानुसार भारताच्या दक्षिण, पश्चिम आणि उत्तर-पश्चिम भागात अनुकूल पाऊस पडेल. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सारख्या मुख्य मान्सूनच्या पावसावर अवलंबून असलेल्या भागात पुरेसा पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. तर बिहार, झारखंड, ओडिसा, आणि पश्चिम बंगालसहित पूर्व राज्यांमध्ये सामान्यापेक्षा कमी पाऊस पडेल, अशी शक्यता आहे.

स्कायमेटनुसार केरळ, कोकण, कर्नाटक आणि गोव्यात सामान्यपेक्षा जास्त पाऊस होणार आहे. देशाच्या मध्य भागात सामान्य पाऊस होणार आहे. स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंह यांच्या मतानुसार, अल निनो जलद गतीने ला नीनामध्ये बदलत आहे. ला नीना वर्षांमध्ये मान्सूनमध्ये मजबूतपणे रुपांतरीत होत आहे. सुपर एल निनोचे मजबूत ला निनामध्ये संक्रमण झाल्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या चांगला मान्सून तयार झालाय. एल निनोच्या अवशिष्ट परिणामांमुळे नुकसान होण्याच्या जोखमीसह पावसाळ्याचा हंगाम सुरू होऊ शकतो. देशभरात लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय तापमान गरम होत आहे. तसा आता तापमानाचा पाराही हळूहळू वर चढत आहे. हवामान विभागाने काही राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्याचबरोबर जवळपास ८ राज्यांमध्ये उष्णतेची लाट येऊ शकते, असा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. राज्यात आज अनेक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.