आजपासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात लागू

0
20

गोंदिया,दि.05-गेल्या अनेक दिवसापासून सुरु असलेली राष्ट्रीय कृषी विमा योजना आता बंद झाली असून आज 5 जुलेॅपासून राज्यात सर्वत्र प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यासंबधीचा शासन निर्णय महाराष्ट्र सरकारने काढला आहे.महाराष्ट्र सरकारच्या कृषी,पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने शासन निर्णय काढला आहे.या योजनेनुसार नैसर्गिक आपत्ती,कीड आणि रोगामूळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्यांना विमा सरंक्षण देण्यात आले आहे.सदर प्रधानंमंत्री पीक विमा योजना लागू केल्याबद्दल तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहागंडाले आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.आमदार रहागंडाले यांनी गोंदिया जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवानी या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहनही केले आहे.या योजनेत शेतकयाकडून पीक विम्यापोटी भरावयाचा हप्ता हा खरीप पिकासाठी 2 टक्के ,रब्बी पिकासाठी 1.5 टक्के आणि नगदी पिकासाठी 5 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग,विज कोसळणे,चक्रीवादळ,पूर,भुस्खलन,दुष्काळ,पावसातील खंड,कीड व रोग,गारपीट इत्यादीमुळे पिकाचे नुकसान व उत्पन्नात घट झाल्यास संरक्षण मिळणार आहे.धान(भात),खरीप ज्वारी,बाजरी,नाचणी,मका,तुर,मुग,उडीद,सोयाबीन,भुईमूग,तीळ सुर्यफूल,कारले,कापूस,खरीप कांदा यां पिकांचा समावेश करण्यात आला आहे.धान(भात)पिकासाठी विमा सरंक्षित रक्कम 39 हजार रुपये असून शेतकर्याने भरावयाच्या पीक विमा हप्त्याची रक्कम 780 रुपये एवढी शासनाने ठरविली आहे.गोंदिया ,चंद्रपूर,नागपूर,गडचिरोली,यवतमाळ,बुलडाणा,वर्धा,अमरावती जिल्ह्यासाठी रिलायंस जनरल इंसुरंश कंपनी लि.वेस्टर्न एक्सप्रेस हायवे,5 वा मजला चिंतामणी एव्हेन्यु,विरानी औद्योगिक वसाहज जवळ,गोरेगाव(ई)मुंबई या कंपनीची निवड करण्यात आली.तर भंडारा,वाशिम आदी जिल्ह्यासांठी भारतीय कृषी विमा कंपनी लि.मुंबईची विमा कंपनी म्हणून निवड करम्यात आली आहे.कर्जदार शेतकरीसाठी 31 जुलेॅ 2016 पर्यंत पीक कर्ज मंजूर करण्याची मुदत असून कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी विमा प्रस्ताव 31 जुलेॅ 2016 पर्यंत सादर करु शकतात असेही म्हटले आहे.