मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्याचे शिष्टमंडळ रशियाकडे

0
5

मुंबई ,दि.09: रशियात होत असलेल्या इनोप्रॉम-2016 या आंतरराष्ट्रीय पातळीवरील औद्योगिक आणि नाविन्यपूर्ण संशोधन विषयक मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे शिष्टमंडळ शनिवारी रात्री उशिरा मॉस्कोकडे रवाना झाले.

या तीन दिवसीय दौऱ्यात विविध आर्थिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश आहे. त्यात मॉस्कोजवळील येकटीरीनबर्ग येथे होत असलेल्या इनोप्रॉम-2016 (INNOPROM-2016) या आंतरराष्ट्रीय औद्योगिक व्यापार मेळाव्यास मुख्यमंत्री भेट देतील. या उपक्रमात जगभरातील औद्योगिक- व्यापारी संस्थांचे प्रतिनिधी, उद्योजक, नेतेमंडळी सहभागी होणार असून मुख्य आयोजक रशियासोबत भारत या उपक्रमाचा संयोजक भागीदार आहे. भारतातील त्यासोबतच ‘येकटिरीनबर्ग एक्स्पो’ या आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक प्रदर्शनात राज्याचे शिष्टमंडळ सहभागी होणार आहे.या प्रदर्शनातील ‘इंडिया पॅव्हिलिअन’चे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून रशिया-इंडिया बिझिनेस फोरममध्ये श्री.फडणवीस उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. भारतातील गुंतवणुकीला चालना हा या पॅव्हिलिअनचा प्रमुख उद्देश आहे. केंद्रिय उद्योग व वाणिज्य राज्यमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन, राजस्थानच्या मुख्यमंत्री श्रीमती वसुंधरा राजे सिंधीया आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचेही यावेळी मार्गदर्शन होईल. स्वेर्डलाव्हस्क प्रांत आणि महाराष्ट्रादरम्यानच्या सामंजस्य करारावर यावेळी स्वाक्षऱ्या होतील. तसेच विविध औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. त्यात रशियन हाय स्पीड रेल्वेज संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

या दौऱ्यात सेंट पीटर्सबर्ग प्रांत आणि महाराष्ट्राच्या शिष्टमंडळादरम्यान नदी शुद्धीकरण प्रकल्पाबाबत चर्चा होणार आहे. मिठी नदीसह काही महत्त्वाचे सामंजस्य करार या भेटीदरम्यान प्रस्तावित आहेत. राज्याच्या शिष्टमंडळात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह त्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, मुंबईचे महापालिका आयुक्त अजोय मेहता, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, एमआयडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक विक्रमकुमार सहभागी होत आहेत.