विद्यार्थ्यांना केंद्राची शिष्यवृत्ती वेळेत मिळण्यासाठी प्रयत्न- आठवले

0
9

सामाजिक न्यायाबरोबरच आर्थिक न्याय देण्याचा प्रयत्न

मुंबई, दि. 11 : मंत्रीपदाच्या माध्यमातून सामाजिक
न्यायाबरोबरच देशातील मागास समाजाला आर्थिक न्याय देण्याचा प्रयत्न करणार
आहे. तसेच मागासवर्गीय व ओबीसी विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती
मिळावी, यासाठी प्रयत्न करू, अशी माहिती नवनिर्वाचित केंद्रीय सामाजिक
न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आज येथे दिली.
मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने मंत्रालयात
आयोजित वार्तालाप कार्यक्रमात आठवले बोलत होते. यावेळी वार्ताहर
संघाचे अध्यक्ष अरविंद भानुशाली, कार्यवाह प्रमोद डोईफोडे, माहिती व
जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) देवेंद्र भुजबळ, ज्येष्ठ
पत्रकार सुकृत खांडेकर आदी उपस्थित होते.
आठवले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर
70 वर्षांनी रिपब्लिकन पक्षाला मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे
दलित जनतेला आनंद झाला असून मला भेटायला येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
त्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे.
मागास समाजातील अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम
वेळेत मिळत नसल्याची तक्रार आहे. तसेच इतर मागास वर्गातील
विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. यासंबंधी माहिती घेतली
असता, राज्याकडून प्रस्ताव वेळेवर येत नसल्याचे कळाले आहे. त्यामुळे हे
प्रस्ताव वेळेत यावेत व शिष्यवृत्तीची रक्कम वेळेत मिळावी, यासाठी आपण
स्वतः बैठक घेऊन लक्ष घालणार आहोत. राज्यातील सामाजिक न्याय विभागाचे
केंद्राकडे असलेले प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू. तसेच
देशातील सर्व राज्यातील समाज कल्याण मंत्र्यांना दिल्लीत बोलावून
त्यांच्या समस्यांवर चर्चा करुन त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार
असल्याचेही आठवले यांनी यावेळी सांगितले.