माजी मंत्री खडसे बदनामी प्रकरणात अंजली दमानियाना समन्स

0
7

जळगाव, दि.13 : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कथित बदनामी प्रकरणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अंजली दमानिया यांच्या विरोधात भा.द.वी. कलम 499, व 500 नुसार खाजगी खटला फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 200 प्रमाणे दाखल केला आहे.विविध ११ ठिकाणी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर बुधवारला मुक्ताईनगर न्यायालयामध्ये सुनावणी झाली. यावेळी फिर्यादी रमेश ढोले यांनी दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी,दमानिया यांनी एकनाथराव खडसे यांच्या विरोधात केलेल्या बेछूट आरोपात कोणतेही तथ्य नाही,असे न्यायालयात सांगण्यात आले. वेळोवेळी कोणतेही पुरावे नसताना दमानिया यांनी प्रसार माध्यमे व, सोशल मिडियाच्या माध्यमातून खडसे यांच्या विरोधात आरोप केले. यामुळे भाजप व खडसे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न दमानिया करत असल्याचे यावेळी न्यायालयात सांगितले.एकनाथराव खडसे यांना गजानन पाटील प्रकरण, दाऊद प्रकरण यामध्ये ते आधीच निर्दोष असल्याचे सिद्ध करण्यात आले आहे. या सुनावणीत भोसरी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडील जमीन खरेदी व्यवहार हा पूर्णपणे कायदेशीर असल्याचे कागदोपत्री पुरावे न्यायमूर्ती समोर सादर करण्यात आले.न्यायमूर्ती तुवर यांनी फिर्यादी बाजूने सादर केलेल्या पुराव्यात तथ्य असल्याचे म्हटले.सुनावणी झाल्यानंतर मा. न्यायमूर्ती तुवर यांनी अंजली दमानिया यांना आपली बाजू न्यायालयात मांडण्यासाठी ६ ऑगस्ट 2016 रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.पुढील सुनावणीला हजर न (न) राहिल्यास दमानिया विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असेही सांगण्यात आले आहे. यावेळी फिर्यादीच्या बाजूने वकील ऍड. एस.सी. टावरी, व्ही. एच. पाटील, हरूल देवरे यांनी काम पाहिले.