सरकारकडून राज्यघटनेचा अवमान – सोनिया गांधीं

0
5

नांदेड, दि. १४ – दिवंगत काँग्रेस नेते शंकरराव चव्हाण यांनी राज्य अन् देशात मोठी पदे सांभाळली़ त्यांनी आयुष्यभर संवैधानिक मुल्यांचे संरक्षण केले. विद्यमान भाजपा सरकारने मात्र सत्तेच्या लालसेपोटी अरुणाचल प्रदेश, उत्तराखंडमधील लोकशाही मूल्य पायदळी तुडवित राज्यघटनेचा अवमान केला, अशी घणाघाती टीका करीत काँग्रेस अध्यक्ष खा़. सोनिया गांधी यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला़

डॉ़. शंकरराव चव्हाण यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच स्मृती संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या़. अध्यक्षस्थानी माजी पंतप्रधान डॉ़. मनमोहनसिंग होते़. यावेळी काँग्रेस अध्यक्ष खा़. सोनिया गांधी म्हणाल्या, काँग्रेस नेतृत्वाची उज्ज्वल परंपरा हे त्यातीलच अग्रणी राहिलेले. डॉ़. शंकरराव यांनी दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविले़ केंद्रात गृहमंत्री व अन्य महत्त्वाची पदे सांभाळली़. ते कधीही संवैधानिक मुल्यांच्या बाहेर जावून काम करण्याचा विचारही करू शकत नव्हते.आज शंकरराव असते तर त्यांना मोठे दु:ख झाले असते, त्यांनी अशा असंवैधानिक राजकारणाचा कठोरपणे विरोध केला असता. निश्चितच आजच्या परिस्थितीत आपणा सर्वांना सर्वोच्च न्यायालयाचा अभिमान वाटला पाहिजे़ न्यायालयाने घटनेचे संरक्षण केले अन् लोकशाही बहाल केली़.
मोदी सरकार व राज्यातील सरकारवर टीका करताना सोनिया गांधी म्हणाल्या, शेतकऱ्यांप्रती शंकरराव चव्हाण यांची कटीबद्धता होती़ त्यांनी सिंचनाच्या योजना आणल्या़ सहकार क्षेत्रामध्ये योगदान दिले़ शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था मजबूत केल्या़ मात्र मोदी सरकार व राज्यातील सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आठवण करून द्यावी लागते़ दुष्काळाबद्दल बोलावे लागते़ तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी युपीए सरकारमध्ये शेतकरी, कामगार, महिला, दलित, आदिवासी यांच्यासाठी ज्या कल्याणकारी योजना राबविल्या, त्या आज कमजोर केल्या जात आहेत़ ज्यामुळे लाखो गरजू लोकांना नुकसान सहन करावे लागत आहे़ एकीकडे उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ केले जात आहे़ अन् शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडले जात आहे़.
शेतकरी, शेतमजुरांची ही हेळसांड काँग्रेस कदापि सहन करणार नाही़ सरकारला वेळोवेळी जाब विचारू, असेही त्या म्हणाल्या़ अध्यक्षीय भाषण करताना माजी पंतप्रधान डॉ़मनमोहनसिंग म्हणाले, नियोजन आयोगामध्ये काम करताना डॉ़शंकरराव चव्हाण यांनी मोठे योगदान दिले़ त्यांचे विचार पुढे नेणे व अपूर्ण काम पूर्ण करणे हीच त्यांच्याप्रती आदरांजली ठरेल, असेही डॉ़मनमोहनसिंग म्हणाले़ प्रारंभी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत केले़ मंचावर माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री डॉ़शिवाजीराव निलंगेकर, नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील, पक्षनिरीक्षक मोहन प्रकाश, माणिकराव ठाकरे, माजीमंत्री पतंगराव कदम, दिलीपराव देशमुख, हर्षवर्धन पाटील, मुकुल वासनिक, खा़राजीव सातव, संजय निरुपम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम, विकास कारखान्याचे अध्यक्ष वैशालीताई विलासराव देशमुख, आ.अमित देशमुख, शैलेष पाटील चाकूरकर, आ. डी़पी़ सावंत, आ. अमिता चव्हाण, आ. अमरनाथ राजूरकर, आ. वसंतराव चव्हाण आदींची उपस्थिती होती़.