सरकारी कार्यालयात तुकडोजी महाराजांचे छायाचित्र लावणे अनिवार्य

0
4

अमरावती,दि.14-वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे छायाचित्र शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात प्रदर्शित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने १२ जुलै रोजी काढला. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या मागणीच्या अनुषंगाने वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सलग दोन वर्षे केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या भजनांच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारच्या विरोधात एल्गार पुकारत समाज जागृती केली . समाजातील अनिष्ट प्रथा , अंधश्रद्धा आदी विरुद्ध त्यांनी नागरिकांना आपल्या ओघवत्या वाणीच्या माध्यमातून जागृत केले . ते एक चालते बोलते विद्यापीठ होते . त्यांच्या दिव्य विचारांचा अंगीकार व्हावा व त्यांचे कायम स्मरण व्हावे म्हणून यांचे छायाचित्र शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात प्रदर्शित करण्याची मागणी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली . सुधीर मुनगंटीवार यांनी या मागणीच्या पूर्ततेसाठी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले असून या पुढे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे छायाचित्र शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात आपल्याला दिसणार आहे.