पीए लाचखोरी प्रकरणी एकनाथ खडसेंना क्लीन चीट

0
17

मुंबई,दि.16 कथित पीए गजानन पाटील लाचप्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्यांना क्लीन चीट दिली आहे.

एसीबीने मुंबई सेशन कोर्टाच्या स्पेशल एसीबी कोर्टात आरोपपत्र दाखल केल आहे. त्यात एकनाथ खडसेंचे नाव नाही. त्यामुळे एकनाथ खडसेंचा या प्रकरणातून निर्दोष सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एसीबीने एका हजारांहून अधिक पाने असलेले आरोपपत्र कोर्टात सादर केले. त्यात केवळ खडसेंचा पीए गजानन पाटील यालाच आरोपी करण्यात आले आहे. गजानन पाटील याला एसीबीने मंत्रालयातील खडसेंच्या दालनातून ताब्यात घेतले होते. विशेष म्हणजे आरोपपत्रात गजानन पाटील याला ताब्यात घेतलेल्या ठिकाणाचाही उल्लेख नाही.

आरोप करणार्‍यांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार
एसीबीने क्लीन चीट दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर आरोप करणार्‍यांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे खडसेंनी म्हटले आहे. आरोप करणार्‍यांनी माझ्याविरोधात एकही पुरावा दिला नाही. पण नैतिकतेतून मी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे खडसेंनी म्हटले आहे.

दुसरीकडे, खडसेंवरील आरोप कागदोपत्री सिद्ध करुन दाखवू, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.