अरुणाचलमध्ये काँग्रेसच; पेमा खंडू नवे मुख्यमंत्री

0
10

वृत्तसंस्था
नवी दिल्ली,दि.16 – अरुणाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री नबाम तुकी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांंनी काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यास सांगितले आहे. पेमा खांडू यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अरुणाचल प्रदेशमध्ये पुन्हा नबाम तुकी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसचे सरकार स्थापन करण्याचा निर्णय सुनावला होता. न्यायालयाने राज्यपालांचा निर्णय घटनाबाह्य ठरविताना 15 डिसेंबर 2015ची स्थिती पूर्ववत करण्याचा आदेश दिला होता. या निर्णयामुळे राज्यात पुन्हा कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाले होते आणि नबाम तुकी यांनी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली होती. तुकी यांना पुन्हा एकदा बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते.

आज (शनिवार) होण्याऱ्या बहुमत चाचणीपूर्वी नबाम तुकी यांनी राजीनामा दिला आहे. मात्र, ते काँग्रेसच्या विधिमंडळ बैठकीला हजर होते. पेमा खांडू यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. तुकी यांनी राजीनामा देताना राज्याला युवा नेतृत्वाची गरज असल्याचे म्हटले होते. काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी नेतृत्व बदल झाल्यास पक्षात परतण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे काँग्रेसने नेतृत्व बदलाचा हा डाव खेळत पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली आहे.