योजनांचा लाभ मिळवून देणे ही सर्वांची जबाबदारी – पालकमंत्री

0
10

गोंदिया.दि.१६ : ग्रामीण भागातील सर्वसामान्य लाभार्थी हा तालुका पातळीवरील कार्यालयात योजनांचा लाभ घेण्यासाठी येऊ शकत नाही. तेव्हा गावपातळीवरील गरजू लाभार्थ्यांचा शोध घेवून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. १५ जुलै रोजी सडक/अर्जुनी पंचायत समिती सभागृहात महासमाधान शिबीराच्या पूर्व तयारीचा आढावा घेतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. सभेला पंचायत समिती उपसभापती विलास शिवणकर, जि.प.सदस्य माधुरी पाथोडे, शिला चव्हाण, पं.स.सदस्य राजेश कठाणे, गिरीधारी हत्तीमारे, तहसिलदार विठ्ठल परळीकर, गट विकास अधिकारी श्री.लोकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री पुढे म्हणाले, ऑगस्ट महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या महासमाधान शिबीराच्या माध्यमातून जवळपास ४० हजार लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याचा आपला संकल्प आहे. या शिबीराच्या यशस्वीतेसाठी विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी/कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींनी नियोजनातून काम करावे. त्यामुळे गरजू लाभार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही.
जिल्ह्यातील अपंग व्यक्तीच्या स्वावलंबनासाठी २ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, अशा दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी दिव्यांग स्वावलंबन अभियान-२०१६ राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तहसिलदार परळीकर, म्हणाले, महासमाधान शिबीराच्या यशस्वी आयोजनासाठी विविध यंत्रणांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावे. लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी कामचुकारपणा करु नये असे सांगितले. यावेळी गजानन वाघ यांनी समाधान शिबीराच्या नियोजनाची व दिव्यांग स्वावलंबन अभियानाची माहिती दिली. महासमाधान शिबीराच्या पूर्व तयारी आढावा बैठकीस सडक/अर्जुनी तालुक्यातील अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, कृषी सहायक, यांचेसह यंत्रणांच्या गावपातळीवरील कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.