जप्त केलेले ३२ लाख जीपीएफमध्ये जमा करा

0
16

सडक अर्जुनी दि.23 : येथील पंचायत समिती मधील कोट्यावधीचा घोळ करणाऱ्या बाबूकडून ३२ लाख रुपये जप्त करण्यात आले. ते शिक्षकांच्या जीपीएफ खात्यावर जमा करण्यात यावे. या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने खंडविकास अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या संदर्भात पालकमंत्री राजकुमार बडोले, जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, विरोधी पक्षनेते गंगाधर परशुरामकर यांना निवेदन देण्यात आले आहे. शिक्षकांचा पैसा त्यांच्या खात्यात दोन महिन्यात जमा न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा किशोर डोंगरवार यांनी दिला आहे.

शिक्षकांच्या विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सडक अर्जुनीच्या पदाधिकाऱ्यांनी खंडविकास अधिकारी ए.आर.लोकरे यांच्या कक्षात जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी गटशिक्षणाधिकारी यू.एम. गौतम, कक्ष अधिकारी जनबंधू उपस्थित होते. नवनियुक्त खंडविकास अधिकारी ए.आर. लोकरे यांचा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. जुनचे वेतन लिपीक वर्गाच्या लेखनी बंद आंदोलनामुळे रखडल्याने बँकेत वेतन पाठविण्याची व्यवस्था गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केली.चर्चेत किशोर डोंगरवार, पी.एन. बडोले, विरेंद्र वालोदे, जी.आर. गायकवाड, नरेश मेश्राम, विलास कोटांगले, एम.एस. डोंगरे, बी.जे. येरणे, जे.डी.मशाखेत्री, पी.एस गुप्ते, जे.व्ही. कराडे, आनंद मेश्राम, भास्कर नागपुरे, अरविंद कापगते, आर.बी. भुसारी, एच.पी. गहाणे, एकनाथ लंजे, भास्कर मुंगमोडे, डी.पी. पर्वते, घनश्याम पर्वते, पी.बी. शहारे उपस्थित होते.