छत्रपती शिवाजी महाराज स्मारक निविदा प्रक्रिया पूर्ण करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
18

मुंबई, दि. 9 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रात
उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाची निविदा प्रक्रिया
पूर्ण करुन काम लवकरात लवकर सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची बैठक झाली. या बैठकीस महसूलमंत्री
चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद
तावडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक
बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, गृह
(ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक
उपक्रम) राज्यमंत्री मदन येरावार, आमदार विनायक मेटे, मुख्य सचिव स्वाधीन
क्षत्रिय, महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान
सचिव प्रविण परदेशी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर,
सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव अशिषकुमार सिंग, वित्त
विभागाच्या प्रधान सचिव मीता लोचन, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा
म्हैसकर, बांधकाम विभागाचे सचिव जोशी, मेरीटाईम बोर्डाचे व्यवस्थापकीय
संचालक अतुल पाटणे आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी
महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक अरबी समुद्रात उभारण्याच्या
कामाची निविदा काढण्यास सुकाणू समितीच्या आजच्या बैठकीत मंजूरी देण्यात
आली. या स्मारकाचा प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रकल्प
आराखड्याचे सादरीकरणही यावेळी करण्यात आले. या प्रकल्पाचा आराखडा तयार
करताना त्यात सर्व बाबींचा समावेश केलेला असावा. तसेच या प्रकल्पाच्या
तांत्रिक बाबींसाठी बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांचे तर इतर बाबींसाठी
इतिहास तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी
यावेळी केल्या.