सरकारचे धोरण डाॅक्टरविरोधी- आयएमएचा आंदोलनाचा इशारा

0
7

वृत्तसंस्था
जळगाव(berartimes.com), दि. २१ : डॉक्टर व रुग्णालयांबाबत सरकार वेगवेगळे कायदे करून डॉक्टरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारच्या या धोरणांमुळे सामान्य रुग्णांच्या कायम सेवेत असणाऱ्या लहान-लहान रुग्णालयांनाच फटका बसत आहे. यामुळे वैद्यकीय सेवा आणखी महाग होऊन रुग्णांना त्यांची झळ सहन करावी लागत आहे. त्यामुळे सरकारने हे धोरण थांबवावे अन्यथा या विरुद्ध आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या पत्रपरिषदेत आज रविवारला देण्यात आला.

आयएमएचे दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन जळगाव येथे आयोजित करण्यात आले होते. समारोपानंतर पत्रपरिषद घेऊन अधिवेशनात झालेल्या निर्णयांबाबत माहिती देण्यात आली. त्या वेळी हा इशारा देण्यात आला.या पत्रपरिषदेस आयएमएचे राज्याध्यक्ष डॉ. जयेश लेले, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे सदस्य डॉ. रवी वानखेडकर, माजी राष्ट्रीय अध्यक्ष अशोक आढाव, उपाध्यक्ष डॉ. अनिल पाटील, डॉ. वर्षा ढवळे, अविनाश घोळवे, जळगाव शहराध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, सचिव विलास भोळे उपस्थित होते.

सरकारकडून वैद्यकीय सेवेला अधिक वेठीस धरले जात आहे. भारतात वैद्यकीय सेवेत ८० टक्के खाजगी तर केवळ २० टक्के वाटा सरकारचा आहे. इतकेच नव्हे आरोग्यासाठीची तरतूदही तोकडी आहे. त्यात सरकार वेगवेगळे कायदे करून छोटे-छोटे रुग्णालय बंद पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. एक प्रकारे सरकार खाजगी मॉल, खाजगी उद्योगांप्रणाणे येथेही खाजगीकरण राबवून मोठमोठ्या हॉस्पिटला चालना देत आहे. यामुळे लहान रुग्णालय बंद पडून वैद्यकीय सेवा आणखी महाग होऊ शकते, अशी शक्यता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे सदस्य डॉ. रवी वानखेडकर यांनी व्यक्त केली.

या सोबतच रुग्णालयांच्या फायर सेफ्टीबाबतही त्रास दिल्या जात असल्याने या विरोधात राज्यभरात आम्ही माहिती घेऊन सरकारला विचार करायला लावणार आहे. तसेच या विषयी सरकारने धोरण निश्चित करावे, असे, राज्याध्यक्ष डॉ. जयेश लेले यांनी सांगितले. तसा निर्णयही बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.