विधीमंडळ सदस्यांना अद्ययावत सुविधा मिळणार

0
11

नागपूरदि.22 येथे येत्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनसाठी विधान परिषद व विधानसभेच्या सदस्यांना मुंबई अधिवेशनाच्या धर्तीवर सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशा सूचना विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिला. आज उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन मंत्री परिषद सभागृहात डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व तयारी बाबतची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी उपसभापती माणिकराव ठाकरे म्हणाले की, हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर विधान सभा व विधान परिषद सभागृहातील कामाचे नुतनीकरण, विधानभवन येथील पुरातन वास्तुला लागून विस्तारीत  इमारतीप्रमाणे नवीन इमारत बांधणे, विधानभवन परिसरात पक्ष कार्यालय व विधीमंडळ कार्यालयासाठी इमारत बांधणे, विधानभवनाची इमारत हेरीटेज इमारत असल्यामुळे वास्तुजतन करण्यासाठी सुचविलेली कामे, जुनी इमारत, नवीन इमारत, बॅरेज व सभोवतालच्या परिसराची देखरेख , साफसफाई व १६० खोल्यांच्या गाळे परिसरात नव्याने प्रस्तावित निवासी इमारतीचे बांधकाम आदीबाबत उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन यासाठी लागणारा निधी व अडचणी लवकर सोडविण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, अधिवेशन काळात सर्व सदस्यांना कामकाजाच्या कालावधीत टॅब, वायफाय, स्कॅनर आदि अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याने त्याची व्यवस्था नुतनीकरण करण्यात येणाऱ्‍या सभागृहात करण्यात याव्यात अशा सूचनाही त्यांनी हयावेळी संबंधित विभागांना दिल्या. भविष्यात ५० वर्षाचा विचार करुन विधानभवन परिसरात नवीन बांधण्यात येणाऱ्या इमारतीचा आराखडा तयार करुन त्यात सर्व सुविधा असतील अशा पद्धतीने आराखडा तयार करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. उपसभापती माणिकराव ठाकरे यावेळी म्हणाले की, विधानभवनाची हेरिटेज इमारत खूप जुनी आहे. ती हेरिटेज असल्यामुळे तिचे जतन करणे अत्यावश्यक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय इंदूरकर यांनी विधानभवन परिसरात सुरु असलेल्या कामकाजाची माहिती देतांना सांगितले की, विधानसभा सभागृहाच्या छताच्या नुतनीकरणाचे २२४.५९ लक्ष रुपये, विधानसभेमध्ये २ कोटी ७६ लाख ५८ हजार रुपयांची वातानुकुलीत यंत्रणा उभारणे, सभागृहात ९९ लाख ४१ हजार रुपयांची विज यंत्रणेचे नुतनीकरण करणे, विधानभवन नागपूर येथे ५०० के.व्ही. ए. क्षमतेचे रु. ३७ लक्ष रुपयांचे रोहीत्र लावणे व ४४ लक्ष ४७ हजार ५०६ रुपयांचे ध्वनी क्षेपण यंत्रणा बसविण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगितले.