युद्धाच्या ढगांनीच पाकचा बाजार गडगडला

0
15

इस्लामाबाद(यूएनआय) – इस्लामाबाद – उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानवर हल्ला करण्याची शक्‍यता असून, पाकिस्तान त्या हल्ल्याचा सामना करण्याची तयारी करत आहे, या अफवांनी काल (ता. 21) पाकिस्तानचा शेअर बाजार गडगडला. पाकिस्तानचा काही हवाई भाग प्रवासी वाहनांसाठी बंद करणे आणि पाकिस्तान हवाई दलाच्या लढाऊ विमानांची उड्डाणे यामुळे ही अफवा पसरली होती. 
दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला असतानाच पाकिस्तानच्या हवाई दलाचा युद्धसराव असल्याने ही घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यातच लढाऊ विमानांच्या उड्डाणांवर सोशल मीडिया आणि पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्यांमध्येही चर्चा सुरू झाल्याने जणू युद्धच होणार, असे वातावरण निर्माण झाले. हा गोंधळ सुरू असतानाही पाकिस्तान सरकारने तातडीने या गोष्टीचा खुलासा केला नाही. त्यामुळे अफवा वेगाने पसरल्या. शिवाय, सरावासाठी म्हणून पाकिस्तानने हवाई हद्द बंद केल्याने माध्यमांवरील चर्चेला जोर आला. त्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांमध्ये घबराहट पसरल्याचा परिणाम होऊन कराची स्टॉक एक्‍स्चेंजचा निर्देशांक 569 अंकांनी कोसळला.